Breaking news

चित्रनगरी लोणावळ्यात यादो की बारात हा बहारदार गीतांचा कार्यक्रम संपन्न

लोणावळा : भारतीय चित्रपट सृष्टीला 111 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोणावळा शहर चित्रनगरीमध्ये यादो की बारात या बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे 111 वर्षांपूर्वी लोणावळा शहरांमध्ये असताना त्यांनी प्रिंटिंग प्रेस चा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यामध्ये मन रमत नसल्याने त्यांनी गोरेगाव येथे सिनेमागृहात काम करायला सुरुवात केली व आपल्या मातृभूमीसाठी सिनेमा तयार करण्याची संकल्पना त्यांच्या मनात आली. त्याकरता त्यांनी इंग्लंड येथे जाऊन छायाचित्रण करणारा कॅमेरा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले कॅमेरा घेऊन आले. हरिश्चंद्रा ची फॅक्टरी हा पहिला मराठी चित्रपट त्यांनी मराठी सिनेसृष्टीला दिला. त्यानंतर 1913 ते 2023 या कालावधी दरम्यान लोणावळा शहरांमध्ये ज्या सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे या सिनेमांमधील बहारदार गाण्यांचा समावेश यादो की बारात या विशेष कार्यक्रमात करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच सिनेसृष्टीमध्ये चित्रीकरणासाठी ज्या लोणावळा खंडाळा व परिसरातील निसर्ग सौंदर्याचा वापर करण्यात आला आहे, त्याबाबतची देखील माहिती उपस्थित रसिकांना देण्यात आली सोबतच लोणावळा शहर व परिसरामध्ये राहणारे सिने तरिका व सिनेतारक यांची देखील माहिती देण्यात आली.

     या कार्यक्रमात लोणावळ्यातील गायक मीनाक्षी गायकवाड, अनिल मांडवडे, किरण कुलकर्णी, राजेंद्र दिवेकर, आर्या बांदल, बापुलाल तारे, प्रल्हाद बनकर, संजीव वीर, अनुप्रिता यादव, चिनमय जगधनी यांनी बहारदार गीतांचे सादरीकरण केले तर त्यांना संगीत साथ ही लोणावळा शहरांमधीलच ज्येष्ठ पेटीवादक चंद्रकांत जोशी, तबलावादक मनोज कदम, विजय वाघचौरे, सुनील बोके, आनंद सूर्यवंशी तसेच मुंबई येथील उस्ताद इकबाल वारसी व अजित चव्हाण यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्ष राधिका भोंडे व माजी मुख्यध्यापक बापूलाल तारे यांनी केले. लोणावळा शहरांमधील या चित्रनगरीचा इतिहास व त्याबाबतचे प्रास्ताविक लोणावळा शहरांमधील इतिहास अभ्यासक आनंद नाईक यांनी लिहिले होते. कल्पना चावला स्पेस अकादमीचे डायरेक्टर संजय पुजारी यांनी दादासाहेब फाळके यांची वेशभूषा सादर करत, त्यांनी शंभर वर्षांपूर्वी कशा पद्धतीने लोणावळा शहरांमधून सिनेसृष्टीच्या वाटचालीला सुरुवात केली याबाबतचे सादरीकरण केले. ते करत असताना शंभर वर्षांपूर्वी आपण या मराठी सिनेसृष्टीचे जनक होऊ किंवा आपल्या नावाने काही विशेष पुरस्कार सुरू होतील अशी पुसटशी कल्पना देखील मनाला शिवली नव्हती असे सांगितले. आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करून दाखवावे याच संकल्पनेतून मराठी सिनेमांची निर्मिती झाली असल्याचे मनोगत दादासाहेब फाळके यांच्या रूपाने व्यक्त केले.

     चित्रनगरी लोणावळा येथील यादो की बारात या गौरवशाली व अविस्मरणीय अशा बहारदार कार्यक्रमाची निर्मिती लोणावळा शहरांमधील लोणावळा वॅक्स म्युझियम व शिवशाही संग्रहालयाचे डायरेक्टर राजेंद्र चौहान यांनी केली होती. या कार्यक्रमाची संकल्पना व त्याचे लेखन लोणावळा शहराचे इतिहास अभ्यासक आनंद नाईक यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन चंद्रकांत जोशी यांनी तर दिग्दर्शन बापूलाल तारे यांनी केले होते.

     लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, विद्या एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज, लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब फाटक, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर भाई शेख, राधिका भोंडे, वत्सला वाळंज, विश्वास कोटकर, नारायण पाळेकर, राजेंद्र चौहान, आनंद नाईक, बापूलाल तारे, नामदेव डफळ, सुरेश गायकवाड, पांडुरंग तिखे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती नटराज यांचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या समारोप्रसंगी उपस्थित रसिक श्रोत्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला त्याकरिता आकर्षक अशी बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोणावळा शहरांमधील चित्रनगरीच्या शंभर वर्षाच्या वाटचालीला उजाळा मिळाला.

इतर बातम्या