Breaking news

Lonavala Rain l आला रे आला… लोणावळा शहरात जोरदार पावसाला सुरुवात

लोणावळा (Lonavala) : मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरातील नागरिक ज्या जोरदार पावसाची व मान्सूनची वाट पाहत होते त्या मान्सूनला आज लोणावळा (Lonavala Rain Start) शहरात सुरुवात झाली आहे. सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पावसाचा वेग हा पुढे वाढत राहिला आहे‌‌. अचानक (Heavy Rain) जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने लोणावळा शहरांमधील रस्त्यांवर जागोजागी पाणी साचू लागले आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांनी वाहने सावकाश चालवावी. तसेच सुरुवातीच्या पावसात ब्रेक मारल्यानंतर वाहने घसरण्याचे प्रमाण जास्त असते, तेव्हा चालकांनी काळजी घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गावरील दृश्यमानता पावसामुळे कमी झाल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून लोणावळा शहरात काळे ढग दाटी करू लागले होते. तसेच वातावरणातील उष्मा कमी होऊन गारवा निर्माण झाला होता. आज सकाळपासूनच शहरात पाऊस पडेल असे वातावरण निर्माण झाले होते सायंकाळी 5:30 वाजता मात्र या जोरदार पावसाला सुरुवात झाली. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 


     लोणावळा शहर (Lonavala City) हे पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील वर्ष विहाराचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळा शहरात येत असतात. येथील नागरिकांप्रमाणेच राज्यभरातील व इतर राज्यातील पर्यटक देखील लोणावळा शहरात पाऊस सुरू होण्याची वाट पाहत असतात. आज जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा हा जोर पुढील काही दिवस असाच काय राहिल्यास लोणावळा शहरातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढणार असून डोंगर भागामधून धबधबे देखील वाहण्यास सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी भात पेरणीची कामे पूर्ण झाली असून या पावसामुळे भात रोपांची वाढ चांगल्या पद्धतीने होणार आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली.

इतर बातम्या