Breaking news

लोणावळ्यात नागरी वस्तीतील मैला मिश्रीत पाणी जातंय इंद्रायणी नदीत; गणेश उत्सवापूर्वी बंदोबस्त करा - राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा इशारा

लोणावळा : लोणावळा शहराच्या नागरी वस्ती मधील मैला मिश्रित पाणी पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये मागील अनेक वर्षांपासून जात आहे. डोंगरगाव या ठिकाणी मला शुद्धीकरण प्रकल्प नगर परिषदेने उभारला असून शहरांमधील मैला मिश्रित पाणी बंदिस्त पाईप लाईन मधून त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च केला असताना देखील इंद्रायणी नदीपात्रामध्ये सदरचे दूषित पाणी जात आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पूर्णतः दूषित झाले असून जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. येणाऱ्या गणेश उत्सवापूर्वी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने इंद्रायणी नदीमध्ये जात असलेले मैला मिश्रित पाणी बंद करावे, इंद्रायणी नदीमध्ये दरवर्षी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. इंद्रायणी नदी हा नागरिकांच्या धार्मिकतेचा व पावित्र्याचा विषय असल्याने नागरिकांच्या भावनांशी प्रशासनाने खेळू नये, तात्काळ ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

     पवित्र अशा इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा शहरातून होतो. उगमस्थानामध्येच इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. लोणावळा नगरपरिषदेने नागरी वस्ती मधील सांडपाणी व मैला मिश्रित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातच इंद्रायणी नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप आले आहे. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात घाण व जलपर्णी निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी केवळ वर वर जलपर्णी काढण्याचा एक कलमी कार्यक्रम नगरपरिषद प्रशासनाकडून राबविला जातो. लोणावळा नगरपरिषदेने डोंगरगाव या ठिकाणी सहा एम एल डी क्षमता असलेला मलशुद्धीकरण प्रकल्प हा नव्याने तयार केला आहे. बाजारभागातील नागरी वस्ती मधील मैला मिश्रित पाणी बंदिस्त जलवाहिनीच्या माध्यमातून डोंगरगाव पर्यंत घेऊन जाऊन त्या ठिकाणी मलशुद्धीकरण प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया करत सदरचे पाणी पुन्हा वापरात आणण्यात येणार होते. या प्रकल्पासाठी लोणावळा नगरपरिषदेने काही कोटी रुपये खर्च देखील केले आहेत. मात्र अनेक ठिकाणी चेंबर लीकेज असल्याने सदरचे दूषित पाणी हे इंद्रायणी नदीपात्रामध्ये जात आहे. काही भागातील पाणी हे थेट नदीपात्रात सोडण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सांडपाण्याची गटारे देखील नदीपात्रात सोडण्यात आली आहेत यामुळे संपूर्ण पात्र हे दूषित झाले आहे.

     मागील अनेक दशकांपासून लोणावळा शहरातील गणपती बाप्पांचे विसर्जन हे इंद्रायणी नदीपात्रामध्ये हनुमान मंदिराच्या शेजारी असलेल्या घाटावर केले जाते. इंद्रायणी नदी हा येथील धार्मिक व भावनिक मुद्दा आहे असे असताना देखील प्रशासन या ठिकाणी ठोस उपाययोजना करताना दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर उर्फ पप्पू भाई शेख व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष विनोद होगले यांनी सांगितले. तसेच गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी देखील त्यांनी आज पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे केली आहे. 

     यावेळी लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासीर भाई शेख, महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाळासाहेब पायगुडे महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष विनोद होगले, लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष श्वेता वर्तक, ज्येष्ठ नेते रमेश दळवी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजू बोराटी, भटक्या विमुक्त सेलचे सरचिटणीस दत्तात्रय गोसावी, महाराष्ट्र प्रदेशचे नारायण जाधव, लोणावळा शहर राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष अजिंक्य कुटे, लोणावळा युवती अध्यक्ष नेहा पवार, सोशल मीडिया सेल अध्यक्ष रवींद्र भोईने, मावळ तालुका कार्याध्यक्ष अमोल गायकवाड, उपाध्यक्ष सुधीर कदम, संजय घाडगे, आदिल शेख, प्रवीण करकेरा, साहिल आरकारी, सलीम मणियार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या