Breaking news

Lonavala Denkar Colony l डेनकर कॉलनी मधील घरामध्ये पहिल्याच पावसात घुसले पाणी; प्रशासन सर्वसामान्यांना न्याय देणार का ? - सुभाष डेनकर

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. डेनकर कॉलनी येथे मात्र अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. या भागात एका बांधकाम व्यवसायकाने मोठ्या प्रमाणात भरणी करत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद केल्याने मागील तीन वर्षांपासून या भागात सातत्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत येथील नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून व निवेदने देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने यावर्षी पहिल्याच पावसात डेनकर कॉलनी मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले असल्याची माहिती या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणारे सुभाष डेनकर यांनी दिली.

     या विषयी बोलताना सुभाष डेनकर म्हणाले, पुरोहित बिल्डर यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भरणी करत पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद केले आहेत. यामुळे 2022 साली देखील डेनकर कॉलनी मधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्यानंतर देखील पुन्हा पुरोहित बिल्डरने या भागात नाले अरुंद करण्याचे व अडवण्याचे काम केल्याने डेनकर कॉलनी, जिजामाता नगर या भागातील पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यावर्षी लोणावळा शहरांमधील कालचा पहिलाच पाऊस व या पहिल्याच पावसामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक पाणी घुसल्याने नागरिकांचे देखील मोठे तारांबळ उडाली. 

     याबाबत आम्ही वारंवार लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला भेटून सर्व परिस्थिती सांगितली आहे. तसेच लेखी निवेदने व त्या भागातील पूर्वीची परिस्थिती व आताची परिस्थिती याबाबतची छायाचित्रे देखील दिली आहेत. मात्र नगर रचना विभाग व बांधकाम विभाग यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. लोणावळा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढत नागरिकांची ही समस्या सोडवावी. अन्यथा लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

इतर बातम्या