महागाईच्या काळात सामुदायिक विवाह सोहळा काळाची गरज! कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 12 जोडपी झाली विवाहबद्ध

लोणावळा : कार्ला येथील श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती यांच्या वतीने (24 एप्रिल रोजी) 12 नवविवाहित जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात श्री दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या प्रांगणामध्ये पार पडला. पारंपरिक पद्धतीने सर्व विधी करण्यात आले, आणि सर्वच जोडप्यांना प्रतिष्ठानतर्फे आवश्यक संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, लग्नसराईसारख्या खर्चिक सोहळ्यांमध्येही काटकसर करणे आवश्यक झाले आहे. यासाठीच सामुदायिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे. यामध्ये खर्चात बचत होण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि समता देखील वाढीस लागत आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून मुला-मुलींच्या लग्न सोहळ्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सोसावा लागतो, एक वेळा जागा विकावी लागते अथवा कर्ज घेऊन लग्नसोळे करावे लागतात. या घटना रोखण्यासाठी व समाजामध्ये बदल घडवण्यासाठी मागील 14 वर्षांपासून कार्ला येथे या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. केवळ सर्वसामान्य कुटुंबातीलच नव्हे तर या सामुदायिक विवाह सोहळा समितीमधील सदस्याने देखील आपल्या मुला मुलींचे विवाह या सोहळ्यामध्ये करून एक आदर्श घालून दिला आहे. लग्न सोहळ्यांवर होत असलेली उधळपट्टी व त्यामधून होत असलेला कर्जबाजारीपणा रोखण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी प्रास्ताविकामध्ये व्यक्त करण्यात आले.
या सोहळ्यात मावळचे आमदार सुनील शेळके, आमदार उत्तम जानकर, भाजपा मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे यांच्यासह सामुदायिक विवाह सोहळा समितीचे संस्थापक भाई भरत मोरे, दीपक हुलावळे, मिलिंद बोत्रे, अजय शिराली, अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गावकरी आणि वऱ्हाडकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांवरचा आर्थिक भार हलका झाला आहे. सामुदायिक विवाह म्हणजे केवळ एक आर्थिक पर्याय नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची दिशा आहे, अन्य संस्थांनीही अशा प्रकारच्या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्ला पंचक्रोशी मधील शाही विवाह सोहळा म्हणून या सामुदायिक विवाह सोहळ्याकडे पाहिले जाते. या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वधूला एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, नथनी, पैंजण, जोडवी, साखरपुडा साडी व लग्नाचा शालू हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व धार्मिक विधी साखरपुडा व हळदी समारंभाची व्यवस्था वधू वर हार, अक्षदांची व्यवस्था, वर राजासाठी साखरपुडा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ, मिरवणूक ती सुद्धा ढोल लेझीम पथक व वाजंत्री यांच्या उपस्थितीमध्ये, येणाऱ्या सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था वधू-वरांना संसार उपयोगी भांडी, झाल, शिलाई मशीन, कुकर या वस्तू विवाह सोहळा समितीच्या वतीने देण्यात आल्या.