Breaking news

गरजूंना दिलासा : संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत मावळातील 128 लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे वाटप

वडगाव मावळ : आमदार सुनील अण्णा जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आला. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या दोन महत्वाच्या सामाजिक योजनेंतर्गत एकूण 128 लाभार्थींना मंजुरी पत्रकांचे वाटप करण्यात आले.

      या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांचं जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमात नबीलाल अत्तार, गणेश तळपे, रूपेश सोनूने, ऋषिकेश गायकवाड आणि केदार बावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

योजना कशा आहेत?

संजय गांधी निराधार अनुदान योजना ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत, निराधार, अपंग, विधवा व घटस्फोटित महिलांसाठी राबवली जाते. या योजनेत दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांचा आधार वाढवला जातो.

श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना - ही 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असून त्यांना दरमहा ठराविक रक्कम निवृत्ती वेतन स्वरूपात दिली जाते, जेणेकरून त्यांचे वृद्धत्व सन्मानाने व्यतीत होऊ शकेल.

       कार्यक्रमात लाभार्थ्यांनी प्रशासन व आमदार कार्यालयाचे आभार मानले. अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

इतर बातम्या