आमदार सुनील शेळके यांच्या ‘जनता दरबार’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 250 आठवड्यांहून अधिक काळ चालू असलेला उपक्रम ठरतोय लोकाभिमुखतेचा मानदंड

वडगाव मावळ : मावळचे आमदार सुनील शेळके यांचा ‘जनता दरबार’ उपक्रम नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत असून, गेल्या साडेपाच वर्षांपासून सातत्याने मिळणारा भरघोस प्रतिसाद त्याचा पुरावा ठरतो आहे. दर सोमवारी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित होणाऱ्या या दरबारात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या अडचणी घेऊन उपस्थित राहतात.
आजच्या जनता दरबारातही नागरिकांनी पायाभूत सुविधांपासून ते आरोग्य व शिक्षण व्यवस्था, पोलिस यंत्रणा, शासन योजनांचा लाभ, तसेच निवृत्तीवेतन व बँक व्यवहारांशी संबंधित अनेक प्रश्न मांडले. खराब रस्ते, अपुऱ्या गटार व्यवस्था, पाणीपुरवठ्याच्या अडचणी व बंद स्ट्रीटलाईट्सबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घरकुल योजनांमधून वगळले जाणे, परवानग्यांतील विलंब व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाईची मागणी या मुद्द्यांनीही आजचा दरबार गाजला. तसंच औषधांची कमतरता, आरोग्य शिबिरांची गरज आणि सरकारी दवाखान्यांच्या कार्यक्षमतेबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.
शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या कमतरतेसह शिष्यवृत्तीच्या तांत्रिक अडचणी आणि शाळा-महाविद्यालयांची अपुरी सुविधा यांच्याकडे लक्ष वेधण्यात आले. पोलिस विभागाकडून होणारे दुर्लक्ष, वाढती गुन्हेगारी व घरफोडीच्या घटना याबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी, लाचखोरीचे प्रकार, आधार कार्ड व बँक खात्यांतील त्रुटी आणि निवृत्तीवेतन मिळण्यात अडथळे याही समस्यांवर नागरिकांनी भर दिला. रोजगाराच्या संधी, कर्जप्राप्तीतील अडचणी व जमिनीशी संबंधित मालकी हक्क, वाद आणि हस्तांतरण प्रक्रियेच्या तक्रारीही मांडण्यात आल्या.
या सर्व समस्यांवर आमदार शेळके यांनी त्वरित संबंधित विभागांना सूचना दिल्या असून, शक्य तितक्या अडचणींचे तिथेच निराकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. अनेक वेळा संबंधित विभागांचे अधिकारीही या दरबारात उपस्थित असतात, त्यामुळे नागरिकांना त्वरित मदत मिळते.
आतापर्यंत सलग २५० पेक्षा अधिक आठवडे चाललेला हा उपक्रम लोकशाही मूल्यांची खरी जाणीव देणारा आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आमदार स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकतात, सखोल विचार करतात आणि शक्यतो त्यावर तत्काळ उपाय शोधतात. काही बाबींसाठी अधिक वेळ लागेल हेही ते स्पष्टपणे सांगतात, तर अशक्य बाबतीतही पारदर्शकपणे भूमिका मांडतात.
कधी कधी अपरिहार्य कारणामुळे आमदार शेळके यांची गैरहजेरी असते, मात्र त्याची माहिती नागरिकांना वेळेवर दिली जाते. त्यामुळे या उपक्रमाचा सातत्य अजूनही अबाधित आहे.
बालकांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिक या दरबारात सहभाग घेतात. ‘जनता दरबार’ हा केवळ तक्रारी नोंदवण्याचा नव्हे, तर लोकशाही संवादाचा एक प्रभावी मंच ठरतो आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार सुनील शेळके यांचा लोकांशी असलेला थेट संपर्क अधिक दृढ झाला आहे. पारदर्शकता, थेट संवाद आणि निरंतर प्रयत्न या त्रिसूत्रीवर उभारलेला ‘जनता दरबार’ मावळमध्ये लोकाभिमुख लोकप्रतिनिधीपणाचा आदर्श बनला आहे.