लोणावळ्यात फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकी व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर वर वाहतूक पोलिसांची कारवाई
लोणावळा : लोणावळ्यात फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकी व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सर वर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत बुलेटचे सायलेन्सर जप्त केले आहेत. मागील काही महिन्यांपासून लोणावळा शहर पोलीस वाहतूक शाखेकडून वारंवार अशा कारवाया होत असताना देखील अनेक तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज करणारे व सायलेन्सर मधून फटाके वाजवणारे सायलेन्सर बसवून बाजारपेठेमध्ये शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये शांततेचा भंग करत आहेत. अनेक दिवसाची चालक आपल्या गाड्यांचे नंबर प्लेट फॅन्सी बनवत आहेत अनेक जण नंबर प्लेटच्या जागांवर दादा, भाऊ अशी नावे किंवा बैल जोडी यांची चित्रे लावत आहेत.
मागील काळामध्ये दुचाकीच्या सायलेन्सर वर लोणावळा शहर पोलिसांनी बुलडोझर फिरवत त्यांचा चुराडा केला होता. आता देखील गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले जात आहेत व त्यांच्यावर पुढील काळात बुलडोजर देखील फिरवला जाणार आहे. पोलीस प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन व कारवाई करून देखील काही दुचाकी चालक कायद्याचा व नियमांचा वारंवार भंग करत आहे. बहुतांश दुचाकी चालक हे महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक चार चाकी वाहनांच्या काळ्या काचांवर देखील पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. अनेक चार चाकी चालक हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दंड वाचवण्यासाठी नंबर प्लेटवर टेप लावून नंबर झाकत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत असे प्रकार सर्रासपणे दिसून येत आहेत. लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले नियमांचा व कायद्याचा भंग करून वाहने चालवणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाणार आहे.
अनेक चार चाकी वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर लावले जात आहेत. अशा वाहनांची देखील पडताळणी करत, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अशीच स्टीकर लावलेली एक चार चाकी गाडी पोलिसांनी जप्त केली होती त्याच पद्धतीने कारवाया केल्या जाणार आहेत. अनेक चार चाकी वाहन चालक पोलीस कारवाया व टोल नाक्यांवर सवलत मिळावी याकरिता कोणाच्यातरी नावाचे स्टिकर आपल्या गाड्यांवर लावत आहेत. व आपण कोणत्यातरी नेत्याचे पुढाऱ्याचे जवळचे असल्याचे भासवत आहेत. पोलिसांनी मात्र अशा वाहनांवर देखील कारवाई मोहीम हाती घेतली आहे, दोषी आढळणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे. पुणे पिंपरी भागात देखील आशा वाहनांवर आयुक्तालयाच्या माध्यमातून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
39 वाहनांवर कारवाई 44 हजार रुपये दंड वसूल
लोणावळा शहर पोलिसांनी आज दिवसभर राबवलेल्या कारवाई मोहिमेत 39 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 44 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक दुचाकी वाहनांचा समावेश असून काही चार चाकी वाहने देखील आहेत. सदरची कारवाई ही लोणावळा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चमन शेख, पोलीस कॉन्स्टेबल शितोळे आदींच्या पथकाने केली
आहे.
















