शांततापूर्ण विसर्जन मिरवणुकीनंतर लोणावळा शहर पोलिसांकडून गणेश मंडळांचा गौरव; अमली पदार्थ विरोधी मोहीम व महिला सुरक्षेवर भर
लोणावळा : अनंत चतुर्दशीच्या दिवशी लोणावळा शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शहरातील सर्व गणेश मंडळांचा आज पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानण्यात आले.
याप्रसंगी बोलताना लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय शांततेत व उत्साहात पार पडली. मिरवणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून काही कडक शब्द वापरले गेले असतील, तर तो कामाचाच एक भाग होता; त्यामुळे कोणीही ते मनावर न घेता पुढील वर्षी ही मिरवणूक अधिक उत्तम कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करूया. या बैठकीत यंदाच्या नियोजनात राहिलेल्या त्रुटींवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पुढील वर्षी या उणीवा भरून काढत अजून चांगल्या पद्धतीने विसर्जन सोहळा पार पाडण्याचा निर्धार उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
इतिहासात प्रथमच सहविचार सभा; गणेश मंडळांकडून उपक्रमाचे स्वागत
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पोलीस प्रशासनाकडून मंडळांच्या बैठका घेऊन आचारसंहिता आणि सूचना दिल्या जातात. मात्र, उत्सव आणि विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर आजपर्यंत कोणतीही सहविचार सभा झाली नव्हती. लोणावळा शहर पोलिसांनी यंदा प्रथमच गणेशोत्सवानंतर ही विशेष सहविचार सभा आयोजित केली. नियोजनानुसार सर्व बाबी पार पडल्या का, कुठे अडचणी आल्या, यावर चर्चा करून पुढील वर्षाच्या आयोजनाची पायाभरणी या बैठकीत झाली. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमामुळे गणेश मंडळांनी तीव्र समाधान व्यक्त केले असून, अशी सहविचार सभा दरवर्षी आयोजित करावी, अशी आग्रही मागणीही पोलीस प्रशासनाकडे केली.
ड्रग्समुक्त लोणावळ्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन
शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या (ड्रग्स) समस्येवर भाष्य करताना पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी याविरोधात सामूहिक लढा देण्याचे आवाहन केले. ड्रग्सची विक्री कुठे होते किंवा ते कुठून येते, याबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे. शहरात इलेक्ट्रिक डिस्प्ले बोर्ड लावून अमली पदार्थांविरोधात जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी गणेश मंडळांनी शक्य असल्यास जागा उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, आगामी काळात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये याविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पर्यटन स्थळांवर महिला व मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
लोणावळा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे दररोज हजारो पर्यटक येत असतात. पर्यटन स्थळांवर महिला व मुलींची छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वतोपरी काळजी पोलीस प्रशासन घेणार आहे. त्यासाठी संवेदनशील भागांमध्ये माहिती फलक लावणे, जनजागृती करणे आणि अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लोणावळ्याची प्रतिमा उज्ज्वल ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि मानाच्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















