Breaking news

Lonavala Traffic l सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी; मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोणावळा : शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांना जोडून आलेल्या 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती अशा सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहरांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. या पर्यटकांच्या गर्दीमुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यास मागील दोन दिवसापासून शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गासह लोणावळा शहरातील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः भुशी धरण लायन्स पॉईंट या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तुंगार्ली धरणाच्या परिसरात देखील पर्यटक सायंकाळच्या सुमारास मोठ्या संख्येने गर्दी करत होते. खंडाळ्यातील राजमाची गार्डन व खंडाळा तलाव तसेच ड्युक्स नोज व मिसिंग लिंकचा पूल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. मावळ तालुक्यातील लोहगड किल्ला विसापूर किल्ला तसेच भाजे लेणी व कार्ला लेणी भागात देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

पर्यटकांच्या गर्दीमुळे हा सर्व परिसर गजबजून गेला होता. एकीकडे वाहतूक कोंडीची समस्या तर दुसरीकडे पर्यटकांच्या गर्दीमुळे व्यवसायात वाढ होत असल्याने छोट्या मोठ्या व्यवसायांमध्ये असलेले समाधान अशा दुहेरी गोष्टी शहरात घडत होत्या. शहरामध्ये येणारे पर्यटक बेशिस्तपणे कशीही वाहने रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला उभे करतात त्यामुळे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वलवन ते खंडाळा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने पेरू विक्रेते आपला व्यवसाय करत आहेत. अगदी रस्त्याला खेटूनच हे व्यावसायिक उभे राहत असल्यामुळे त्या ठिकाणी पेरू विकत घेण्यासाठी उभी राहणारी वाहने ही थेट रस्त्याच्या मध्ये उभी राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वलवन या ठिकाणी मॅप्रो गार्डन व फूड कोर्ट या ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही तसेच व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांकडून देखील वाहने उभे करण्यासाठी कोणतेही योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून हा वाहतूक कोंडीचा नवीन ब्लॅक स्पॉट तयार झाला आहे.

लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे येथील स्थानिक प्रशासनात सोबतच महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे कर्तव्य असताना देखील याकडे प्रशासनांकडून काना डोळा केला जात आहे. शहरात कोठेही वाहन तळाची सुविधा उपलब्ध नाही. रस्त्यांच्या बाजूला स्थानिक व्यवसायिकांचे वाढत असलेले अतिक्रमण हे देखील वाहतूक कोंडीला निमंत्रण ठरत आहे.

इतर बातम्या