सिंहगड पब्लिक स्कूल, लोणावळा येथे सीबीएसई दक्षिण विभाग-२ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप; 100 हून अधिक खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (STES) अंतर्गत सिंहगड पब्लिक स्कूल, लोणावळा येथे आयोजित सीबीएसई दक्षिण विभाग-२ क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ चा समारोप २ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या क्रीडांगणावर अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या सहा दिवसीय भव्य स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधील १५० हून अधिक शाळांतील १२०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
१०० हून अधिक खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे १०० हून अधिक गुणवंत खेळाडूंची 'सीबीएसई राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धे'च्या पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू मदुराई (तामिळनाडू) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पुढील फेरीत सहभागी होऊन आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेच्या समारोप समारंभास भारतीय किकबॉक्सिंग क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व श्री. जयदेव म्हमाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर पारंपरिक कुस्तीपटू श्री. बाबासाहेब घुले यांची विशेष उपस्थिती लाभली. खेळाडूंना संबोधित करताना श्री. जयदेव म्हमाणे यांनी मेहनत, शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. विजयाचा आनंद साजरा करतानाच पराभवातून शिकून अधिक मजबूत होण्याचा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी युवा खेळाडूंना दिला. STES चे प्रकल्प अधिकारी डॉ. एम. एस. गायकवाड यांनीही सर्व खेळाडू व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. क्रीडा क्षेत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जिद्द विकसित होते, असे प्रतिपादन करत त्यांनी राष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि संघांचा गोल्ड, सिल्व्हर व ब्रॉन्झ पदकांनी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या भव्य आयोजनाच्या यशामागे डॉ. एम. एस. गायकवाड, कॅम्पस संचालक डॉ. राजेंद्र लोखंडे, सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशनचे संचालक डॉ. कौस्तुभ गायकवाड, सीबीएसई दक्षिण विभाग प्रमुख संतोष खैरनार, तसेच सर्व पंच, प्रशिक्षक, क्रीडा अधिकारी आणि इस्टेट विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेचे यशस्वी समन्वय, नियोजन व तांत्रिक व्यवस्थापन आयोजन सचिव तथा TGT (क्रीडा) श्री. राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या क्रीडा समितीने अतिशय नेटकेपणाने पार पाडले. विविध राज्यांतील खेळाडूंचा भरघोस सहभाग आणि राष्ट्रीय स्तरासाठी झालेली निवड यामुळे ही स्पर्धा युवा क्रिकेटपटूंसाठी अत्यंत संस्मरणीय ठरली.
















