Mumbai Pune Missing Link l मुंबई पुणे मिसिंग लिंक वर केळी वाहतूक करणारा पिकअप टेम्पो पलटी; रस्त्यावर सर्वत्र केळीच केळी
लोणावळा : मुंबई पुणे मिसिंग लिंक वर केळी वाहतूक करणारा एक पिकअप टेम्पो पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्यामध्ये पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र केळीच केळी पसरली होती. या अपघातामुळे काही वेळ मुंबई पुणे मिसिंग लिंक वरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.
या अपघातामध्ये टेम्पोचालक समीर शेख हा जखमी झाला असून त्याच्यावर खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने केळी घेऊन जाणारा एक पिकप टेम्पो क्रमांक (MH 45 AF 9324) वरील चालक समीर शेख याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यामध्ये पलटी झाली. पिकप टेम्पो हा केळीचे घड याने भरलेला होता. टेम्पो पलटी झाल्यामुळे टेम्पो मधील सर्व केळीही रस्त्यावर पसरली गेली. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र केळीच केळी पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे मुंबई पुणे मिसिंग लींक मुंबई मार्गीके वरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
















