लायन्स क्लब लोणावळा खंडाळ्याच्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ्याच्या वतीने सोमनाथ महादेव मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य तपासणीसाठी १०९ नागरिकांनी, तर नेत्र तपासणीसाठी ५६ नागरिकांनी सहभाग घेतला. तपासणीनंतर गरजू नागरिकांना अत्यल्प व माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. “आरोग्य हीच आपल्या जीवनातील खरी संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी सोमनाथ महादेव ज्येष्ठ नागरिक युवक मंडळाचे अध्यक्ष बबनदादा आनसुरकर, उपाध्यक्ष तुकाराम तिकोने तसेच मंडळाचे सल्लागार दिलीप पवार यांनी उपस्थित मान्यवर व डॉक्टरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. या शिबिराची प्रमुख जबाबदारी लायन डॉ. ऋजुता तांडेल गोजे यांनी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली लायन लीना पौन, लायन डॉ. दिलीप सुराणा, लायन डॉ. पोपट ओसवाल तसेच नेत्र तपासणीसाठी डॉ. जीवक मोहिते यांनी नागरिकांची तपासणी करून शिबिर यशस्वीपणे पार पाडले.
ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी क्लबच्या सदस्य लायन निराली नाळेकर यांनी मनोरंजनात्मक प्रश्न विचारून त्यांचे मनोरंजन केले. त्यामुळे शिबिराला आरोग्य तपासणी सोबतच आनंददायी वातावरण लाभले. कार्यक्रमास रिजन चेअरपर्सन लायन सलीम शिकलगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या मनोगतात त्यांनी लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ्याच्या सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे कौतुक करून क्लबने भविष्यातही अशाच प्रकारच्या मोठ्या व समाजोपयोगी ॲक्टिव्हिटी आयोजित कराव्यात, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी क्लबचे सचिव लायन राजेश राजपूत, खजिनदार लायन रोहित थोरात, लायन देवेंद्र नाळेकर, लायन अश्विनी कदम, लायन हेमाक्षणी राजपूत, लायन स्नेहलता माळी, लायन कांता ओसवाल, लायन कैलास माळी, लायन अभय जैन तसेच लायन्स क्लबचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांची टीम, सोमनाथ महादेव ज्येष्ठ नागरिक युवक मंडळ, लायन्स क्लबचे सर्व सदस्य तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष लायन मंगेश कदम यांनी मनःपूर्वक आभार मानले. नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद हा लायन्स क्लबच्या सेवाभावी कार्याला मिळालेली मोठी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
















