Mumbai Pune Missing Link l पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवर भीषण अपघात; ट्रॅव्हल्स बस चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरला मागून धडक; २ जण गंभीर, ७ किरकोळ जखमी
लोणावळा : पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळा येथील कनेक्टिंग लिंकवर आज, मंगळवार (६ ऑक्टोबर २०२६) रोजी पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. वेगात असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने समोर चाललेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्स बसचे चालक आणि शेजारी बसलेले एक प्रवासी असे २ जण गंभीर जखमी झाले असून, अन्य ६ ते ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज पहाटे ४:५० वाजताच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर (कनेक्टिंग लिंक किलोमीटर ०८/१००, CP १९ व CP २० दरम्यान) हा अपघात घडला. कंटेनर (क्रमांक TN ०२ CB ००३१ - चालक: मुहम्मद हमीद सुहेब, वय ३०, रा. कन्नूर, तामिळनाडू) पुढे जात असताना, मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसच्या (क्रमांक MH २० EL ५१००) चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते.
अपघाताची बातमी पहाटे ४:५५ वाजता कनेक्टिंग लिंक नियंत्रण कक्षाकडून मिळताच, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) रवींद्र मुदळ, हवालदार माने, बनकर, भोसले, पोलीस शिपाई साळुंखे, बोराडे तसेच एमएसएफ जवान गोपाळ आणि चव्हाण यांनी अवघ्या १० मिनिटांत (सकाळी ५:०० वाजता) घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पथकाने तत्काळ रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी हलवले. गंभीर आणि किरकोळ जखमींना लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटल, तळेगाव येथील पवना हॉस्पिटल आणि खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला घेऊन सुरक्षित स्थळी हलवली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. बसमधील इतर उर्वरित प्रवाशांना पर्यायी वाहनांची व्यवस्था करून रवाना करण्यात आले. सकाळी ६:३० वाजेपर्यंत अपघाताची संपूर्ण प्राथमिक कारवाई पूर्ण करण्यात आली.
या घटनेबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पुढील तपास करत आहे.
















