Breaking news

लोणावळ्यात पार्किंगमधील वादातून तिघांवर बांबू अन् दगडाने जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

लोणावळा : रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगमध्ये झालेल्या क्षुल्लक बाचाबाचीच्या कारणावरून तरुणांच्या गटावर लाकडी बांबू व दगडाने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना लोणावळ्यात घडली आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात प्रथमेश (पचू) कदम याच्यासह त्याच्या तीन अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर युवराज पाटील (वय ३२, व्यवसाय- नोकरी, रा. भांगरवाडी, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) हे शनिवारी, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास त्यांचे मित्र अनिकेत जाधव आणि शुभम चौगुले यांच्यासह टाटा ब्रिजच्या पुढे असलेल्या एका चहाच्या टपरीसमोर थांबले होते.

लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरातील बाजारातील पार्किंगमध्ये झालेल्या आधीच्या बाचाबाचीचा राग मनात धरून आरोपी प्रथमेश आणि त्याच्यासोबत आलेल्या तीन अनोळखी इसमांनी संगणमत करून सागर पाटील व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

या मारहाणीदरम्यान आरोपी प्रथमेश कदम याने जवळच पडलेला लाकडी बांबू उचलून सागर पाटील यांच्या दोन्ही हातांवर जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याने रस्त्यावरील दगड उचलून सागर यांच्या उजव्या पायावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादींचे मित्र अनिकेत जाधव यांच्यावरही बांबूने हल्ला चढवत त्यांच्या डाव्या हातावर व पायावर मारहाण करून दुखापत केली.

याप्रकरणी रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४.१९ वाजता लोणावळा शहर पोलीस ठाण्यात सागर पाटील यांच्या फिर्यादीवरून प्रथमेश (पचू) कदम व त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मयुर अबनावे करत आहेत.

इतर बातम्या