Breaking news

लोणावळा शांती चौकात अज्ञात कारणावरून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला

लोणावळा : येथील शांती चौक परिसरात एका तरुणावर धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) दुपारी घडली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी राहुल यशवंत वाघमारे याच्याविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद प्रकाश फाटे (वय ३४, रा. औंढे रोड, कुसगाव, ता. मावळ) हे शनिवारी दुपारी २.३० वाजता लोणावळ्यातील शांती चौक येथे चरण यांच्या चिक्कीच्या दुकानासमोर उभे होते. यावेळी कथित आरोपी राहुल यशवंत वाघमारे याने कोणतेही कारण नसताना फिर्यादी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपीने डोक्यात, खांद्यावर तसेच डाव्या हातावर धारदार हत्याराने सपासप वार केले. जीवे मारण्याची धमकी देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात प्रमोद फाटे हे गंभीर जखमी झाले.

      या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंदनशिवे करीत आहेत. 

इतर बातम्या