Breaking news

Crime News l पत्नीच्या डोक्यात दगड घालून पतीने केली निर्घृण हत्या; चार तासांच्या थरारक पाठलागानंतर आरोपी जेरबंद

लोणावळा : मावळ तालुक्यातील ठाकूरसई येथे दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्यानंतर घनदाट जंगलात पसार झालेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल चार तासांच्या थरारक शोधमोहिमेनंतर ताब्यात घेतले. तुकाराम वसंत पवार असे या आरोपीचे नाव असून, या घटनेमुळे पवनानगर परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी मावळ तालुक्यातील ठाकूरसई, पवनानगर परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी तुकाराम पवार हा घनदाट जंगलाच्या दिशेने पसार झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीचा शोध घेण्यासाठी चार स्वतंत्र पोलीस पथके तयार केली.

आरोपी जंगलात पळून गेल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घनदाट जंगल, दुर्गम भाग आणि आरोपीच्या पलायनाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेतली. चारही पथकांनी विविध भागांत शोध घेत आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि सुमारे चार तासांच्या थरारक पाठलागानंतर आरोपी तुकाराम वसंत पवार याला ताब्यात घेण्यात आले.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे, अवैध दारू विक्री आणि दारू निर्मितीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशा अवैध व्यवसायांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने यांनी सांगितले.

दारूसह गांजा आणि इतर अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधातही पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित करून कारवाई सुरू आहे. अशा अवैध धंद्यांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यासह अनेक कुटुंबांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या