Breaking news

लोणावळ्यात एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या चौघांवर पोलिसांची धडक कारवाई; मारुती स्विफ्ट कारसह अमली पदार्थ जप्त

लोणावळा : लोणावळा शहरात बेकायदेशीरपणे मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्स या अमली पदार्थाची विक्री व सेवन करण्यासाठी आलेल्या चार जणांच्या टोळीवर लोणावळा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ५ ग्रॅम एमडी अमली पदार्थ आणि एक मारुती स्विफ्ट कार जप्त केली आहे.

      दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव व पोलीस शिपाई राहुल चोरगे यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, तुंगार्ली गावच्या हद्दीतील 'लगुना रिसॉर्ट'समोरील मोकळ्या जागेत काही इसम मारुती स्विफ्ट कार (क्र. MH 14 BC 9631) मधून अमली पदार्थांच्या विक्री व सेवनासाठी येणार आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाड टाकून चारही इसमांना ताब्यात घेतले. मयुर निवृत्ती गोणते, दिनेश शशिकांत दळवी, मंगेश रमेश लोखंडे (तिघेही रा. ओळकाईवाडी, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे), दत्ता संजय बेदरकर (रा. स्वराज्य नगरी, बारा बंगला, लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या या इसमांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एकूण ५ ग्रॅम मॅफेड्रॉन हा घातक अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सदर धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, लोणावळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव, पोलीस हवालदार मयुर अबनावे, शशिकांत खोपडे, विष्णू फटांगडे, पोलीस शिपाई धनंजय आगवणे, राहुल चोरगे, अंकुश पाटील, स्वप्निल पाटील, निलेश सोनवणे आणि तुषार शिंदे हे सहभागी झाले होते.

      लोणावळा व खंडाळा परिसरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी व नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मॅफेड्रॉन किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन करू नये. तसेच परिसरात कोणी अमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास त्वरित ११२ या आपत्कालीन क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे.

इतर बातम्या