Breaking news

लोणावळ्यात कौटुंबिक वादातून आजोबांनी झाडली नातवावर गोळी; ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहरातील भुशी गावच्या हद्दीत असलेल्या मोतीराम हॉटेलमध्ये कौटुंबिक वादातून आजोबांनी आपल्याच नातवावर परवानाधारक रायफलमधून गोळी झाडून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीआर (DVR) लपविल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास भुशी येथील मोतीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोतीराम रावजी मराठे (वय ८३ वर्षे) याने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आपल्याकडे असलेल्या परवानाधारक १२ बोअर रायफलमधून नातू ॲड. अभय माणिक मराठे (वय ३२ वर्षे, रा. घर क्र. ४, तुळसा निवास, भुशी, लोणावळा) याच्यावर गोळी झाडली. यामध्ये अभय मराठे याचा जागीच मृत्यू झाला. अभय हा शिवसेना माजी नगरसेवक माणिक मराठे यांचा मुलगा आहे. या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ निर्माण झाली आहे.

सीसीटीव्ही आणि डिव्हीआर गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मयत ॲड. अभय मराठे हा शिवसेनेचे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचा मुलगा आहे. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. आरोपींना 12 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनेनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आणि घटना दडपण्यासाठी मयताचे चुलते हिरामण मोतीराम मराठे (वय ५४ वर्षे), चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे (वय ३२ वर्षे), कविता हिरामण मराठे (वय ५० वर्षे) आणि हिरामण यांची बहीण राजश्री दशरथ पवार (वय ५८ वर्षे) यांनी आपसात संगनमत केले. आरोपींनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डिव्हीआर व कॅमेरे काढून ते अज्ञात ठिकाणी लपवून ठेवले.

पोलीस उपनिरीक्षकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

याप्रकरणी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सदानंद सावंत (वय ३६) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी १) मोतीराम रावजी मराठे, २) हिरामण मोतीराम मराठे, ३) मनोज हिरामण मराठे, ४) कविता हिरामण मराठे आणि ५) राजश्री दशरथ पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८, २४१, ३(५) सह आर्म ॲक्ट कलम ३, २७(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेची नोंद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील करत आहेत.

पुणे ग्रामीण एलसीबी केला घटनेचा उलगडा

लोणावळा शहर पोलिसांनी या घटनेचा तपास करून अकस्मात मयत अशी नोंद घेतली होती. मात्र मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शव विच्छेदनासाठी आणला असता गोळी लागलेला प्रकार पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस कॉन्स्टेबल गणेश होळकर, संतोष शेळके, सागर नामदास व पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली असता तेथील परिस्थिती पाहून ही चुकून उडालेली गोळी नसून काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे जाणवल्याने त्यादृष्टीने तपास केला असता ही घटना अकस्मात मयत नसून हत्या असल्याचे उघडकीस आणत आरोपी मोतीराम मराठे यांना पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. ही घटना घडल्याची माहिती असताना देखील तो प्रकार लपवत मुख्य आरोपीला गुन्हा लपविण्यास मदत केल्याप्रकरणी इतरांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी घटनास्थळाला रात्री भेट दिली. सुरुवातीला रायफल साफ करताना अचानक गोळी उडून अपघात झाला असल्याचे मराठे कुटुंबीय यांनी भासविले मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत हा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.

आदर्श एकत्र कुटुंबात अशी घटना घडल्याने परिसरात खळबळ

मोतीराम मराठे हे 83 वर्षांचे असून त्यांनी आपले कुटुंब एकत्र बांधून ठेवले होते. ते व त्यांची सर्व मुले, सुना, नातवंड असा सर्व परिवार एकत्रित रहात होता. लोणावळा भागातील आदर्श कुटुंब म्हणून मराठे कुटुंबाकडे पहिले जात होते. मात्र आज त्याच कुटुंबातील मुख्य व्यक्तीने म्हणजेच आजोबाने आपल्या वकील नातवाची गोळी झाडून हत्या केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून झाली की, जागेच्या वादातून झाली असे अनेक तर्क पुढे येऊ लागले आहेत. अंतिम सत्य मात्र पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. तपास निष्पक्ष होण्यासाठी तो वडगाव मावळ पोलिसांकडे

देण्यात आला आहे.

इतर बातम्या