लोणावळा बस स्थानकाच्या नूतनीकरणास गती मिळणार – आमदार सुनील शेळके यांची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक

लोणावळा : येथील बस स्थानकाच्या झालेल्या दुरवस्थेचा आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची विधानभवन, मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत आमदार शेळके यांनी लोणावळा बस स्थानकावरील असुविधा, मूलभूत सोयींचा अभाव आणि प्रवाशांच्या समस्यांचा आढावा मांडला. या समस्यांवर गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, "सदर नूतनीकरण प्रकल्प टेंडर प्रक्रियेत असून लवकरच मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल."
पीपीपी मॉडेलवर उभारणार सुसज्ज बस स्थानक संकुल
लोणावळा बस स्थानकाचा नूतनीकरण प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. प्रस्तावित संकल्पनेनुसार, या ठिकाणी स्वच्छतागृहे, कॅफेटेरिया, हॉटेल, व्यावसायिक सुविधा आणि आरामदायी प्रतीक्षालय यांसारख्या विविध सुविधा असलेले सुसज्ज संकुल उभारले जाणार आहे. "नागरिकांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लोणावळा बस स्थानकाचे नूतनीकरण ही काळाची गरज आहे. या प्रकल्पाची वेळेत अंमलबजावणी होण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहोत," असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.