ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेत 'ग्रीन फेस्टिवल' विविध उपक्रमांनी साजरा

लोणावळा : लोणावळ्यातील एकमेव मुलींची शाळा असलेल्या ऑक्झिलियम काॅन्व्हेंट शाळेत वन महोत्सव सप्ताह (ग्रीन फेस्टिवल) आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त विद्यार्थिनींना वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षण, प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करणे, हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देखील देण्यात आला. मागील आठवड्यामध्ये शाळेच्या वतीने वन सप्ताह निमित्त लोणावळा धरण परिसरामध्ये शंभर झाडांची लागवड केली आहे. तर आज या वन सप्ताहाच्या समारोपानिमित्त शाळेच्या आत मधील व शाळेच्या बाहेरील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर रोझी मस्करेन्हास, मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोन्स, पर्यवेक्षिका सिस्टर शोभा डिसोझा व सर्व शिक्षकवर्ग यांच्या पुढाकाराने हा वन सप्ताह यशस्वीपणे पार पडला. टाटा पॉवर च्या सहकार्याने 500 झाडे लावण्यात आली आहेत.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण रक्षणाचे संदेश दिले. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि सादरीकरणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. यामध्ये टाकाऊ वस्तु पासून आकर्षक सजावटीची कलाकृती तयार करण्यात आल्या होत्या. घरच्या घरी वापरत नसलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करत प्लास्टिक बंदीचा संदेश देण्यात आला. पक्षांसाठी टाकाऊ वस्तु पासून तयार केलेले फीडर्स व जैवविविधतेचे सादरीकरण करण्यात आले. चवदार व पौष्टिक हिरव्या भाज्यांचे महत्त्व विशद करण्यासाठी स्टॉल लावत आरोग्यदायी आहाराचा संदेश देण्यात आला. तसेच जंक फूड विरोधी मोहीम राबवत विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टरद्वारे जनजागृती केली होती. मुलांनी सादर केलेल्या या कलाकृतीचे पालक शिक्षक सदस्यांनी निरीक्षण करून कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगाव येथील सुपर्णा गायकवाड, टाटा कंपनीचे प्रतिनिधी मिलिंद रावल, सर्पमित्र व पर्यावरण प्रेमी शिक्षक रंगनाथ वरे, शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर रोझी मस्करेन्हास, मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोन्स, पर्यवेक्षिका सिस्टर शोभा डिसोझा, लोणावळा नगर परिषदेचे ग्रंथपाल विजय लोणकर, उद्यान विभागाचे जितेंद्र राऊत, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक विवेक फडतारे व पीटीए मेंबर उपस्थित होते.
या निमित्ताने विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी आज शाळा परिसरात सामूहिक रित्या 30 नवीन वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्ष दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. लोणावळा नगर परिषदेचाही या उपक्रमात सक्रीय सहभाग होता. त्यांनी शाळेबाहेरही वृक्षारोपणासाठी सहकार्य केले. ऑक्झिलियम शाळेचा ग्रीन फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम न राहता, एक पर्यावरण जागृती चळवळ बनला आहे. विद्यार्थ्यांमध्ये हरित विचारांची बीजे रोवण्याचे कार्य या उपक्रमातून साधले गेले असल्याचे मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोन्स यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर रोझी मस्करेन्हास, मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोन्स, पर्यवेक्षिका सिस्टर शोभा डिसोझा, सिस्टर ब्रिनल सांबरे, शिक्षिका अस्मा निंबारगी, युनिटा पत्राव, ममता गावडे, सायली वाडकर, अश्विनी निंबळे, स्नेहल भोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.