सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

लोणावळा : कुसगाव येथील सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या पोशाखात सहभागी होत टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि “विठ्ठल नामाच्या” जयघोषात संपूर्ण संकुल परिसर विठ्ठलमय केला होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य एन. के. मिश्रा यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगितले. उपवास, तुळशी आणि भगव्या ध्वजाचा वारकरी परंपरेत असलेला स्थान यावरही त्यांनी माहिती दिली. सिंहगड संकुलात पर्यावरणपूरक दिंडी काढून विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण वाचवा’ हा संदेश दिला. संकुलातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
या विशेष कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक एम. एन. नवले, सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष (ॲडमिन) रचना नवले-अष्टेकर आणि एच. आर. प्रमुख रोहित नवले यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.