Lonavala Rain Information l लोणावळ्यात पावसाने शंभरी ओलांडली ! यावर्षी आजपर्यंत 103 इंच पावसाची नोंद; मागील 24 तासात 113 मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात यावर्षी मे महिन्याच्या अखेरपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाने लवकर हजेरी लावल्याने 7 जुलै रोजीच पावसाने शंभरी ओलांडली आहे. लोणावळा शहरात मागील सव्वा महिन्यात तब्बल 102.95 इंच (2615 मिमी) पावसाची नोंद झाली आहे. लोणावळा शहरात दरवर्षी होत असलेल्या पावसाच्या निम्मा पाऊस आताच झाला आहे. आजुन संपूर्ण जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे पावसाचे महिने शिल्लक आहेत. पावसाचा जोर पुढे देखील असाच कायम राहिल्यास मागील अनेक वर्षाचे रेकॉर्ड यावर्षी पाऊस तोडेल अशीच शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
रविवारी दिवसभर लोणावळा शहरात जोरदार पाऊस झाला आहे. पहाटेपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान विभागाने पुढील तीन दिवस म्हणजेच 10 जुलै पर्यंत पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
लोणावळा शहरात मागील वर्षी आजपर्यंत 1078 मिमी (42.44 इंच) पाऊस झाला होता. यावर्षी मागील वर्षी च्या तुलनेत 1537 मिमी (60.51 इंच) जादा पाऊस झाला आहे.