Breaking news

Lonavala Monsoon l महाराष्ट्रात नियोजित वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने लोणावळ्याकडे फिरवली पाठ

बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी What's App ग्रुप मध्ये सहभागी व्हा

लोणावळा : महाराष्ट्र मध्ये यावर्षी नियोजित वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला. तसेच हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचे भविष्यवाणी देखील केली. असे असले तरी जून महिना संपत आला तरी घाटमाथ्यावरील पावसाचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या लोणावळा, खंडाळा परिसरात मान्सूनने पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. 24 जून पर्यंत लोणावळा शहरांमध्ये 450 मिलिमीटर (17.72 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाची तुलना केली तर हा पाऊस आज मितीला जास्त वाटत आहे. पण एकंदरीतच हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज व महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सुरू असलेला जोरदार मुसळधार पाऊस या तुलनेत लोणावळा खंडाळा या घाटमाथ्यावरील ठिकाणी दोन-तीन दिवसातील जोरदार सरी वगळता अतिशय अल्प पाऊस झाला आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका पर्यटन नगरीला बसला आहे.

       जून महिना सुरू झाल्यानंतर लोणावळा शहरामध्ये मान्सूनचे आगमन होते. पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा खंडाळा ही शहरे जगप्रसिद्ध असल्याने दर शनिवार रविवार व सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये हजारो पर्यटक वर्षाविहारासाठी लोणावळ्यात येण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन ही शनिवार रविवार लोणावळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षाविहारासाठी आले होते. आल्यानंतर या ठिकाणी कडक उन्हामुळे व गर्मीने ते अक्षरशः हैराण झाले होते. अनेक पर्यटक भुशी धरणाच्या दिशेने जात होते. धरणावर गेल्यानंतर, धरणाच्या तळाशी गेलेला पाणीसाठा व कोरड्या पडलेल्या पायऱ्या पाहूनच त्यांना माघारी फिरावे लागत होते. लायन्स पॉईंट परिसरात देखील संध्याकाळची वेळ वगळता दिवसभर उष्णता जाणवत असल्याने त्या भागात देखील फारसे पर्यटक फिरकले नाहीत. याचा परिणाम त्या दोन्ही ठिकाणच्या स्थानिक व्यवसायिकांवर झाला आहे. पर्यटकांप्रमाणेच पावसाची वाट पाहत भुशी धरण, लाईन्स पॉईंट, सहारा पुल धबधबा आदी पर्यटन स्थळांवरील व्यवसायिक आपल्या व्यवसायाचे नियोजन करत असतात.

बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी What's App ग्रुप मध्ये सहभागी व्हा

     जोरदार पावसाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने लोणावळा व खंडाळा भागात विविध डोंगर भागातून वाहणारे धबधबे हे अद्याप कोरडेच आहेत. लोणावळा धरणातील पाणी तळाशी गेले आहे, तर भुशी धरण भरण्यासाठी अजून काहीसा अवधी असल्याने पर्यटक या भागात गर्दी करतात मात्र थांबत नसल्याने केवळ रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र मागील दोनही आठवड्यांमध्ये पाहायला व अनुभवायला मिळाले आहे. पर्यटकांप्रमाणेच लोणावळा खंडाळा व परिसरामधील स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, चिक्की व्यवसायिक, पर्यटनावर अवलंबून असलेले इतर छोटे मोठे व्यावसायिक हे देखील पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत. रायगड, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात सध्या जोरदार पाऊस पडत असला तरी मुंबई व लोणावळा भागात पावसाला उशीर झाला आहे. दोन दिवसापूर्वीच हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पुढील आठवडाभर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. असे असले तरी घाट माथ्यावर अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही.

इतर बातम्या