Breaking news

Lonavala One Way l लोणावळा शहरात एकेरी वाहतुकीची होणार कायमस्वरूपी अंमलबजावणी; नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

लोणावळा : लोणावळा बाजारभागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 14 जून ते 21 जून दरम्यान लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्तपणे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. एकेरी वाहतुकीमुळे बाजारभागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 18 जून रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लोणावळा बाजार भागातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी एकेरी वाहतुकीचा पर्याय कायम करण्याची लेखी मागणी लोणावळा नगरपरिषदेकडे केली होती. 

         लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या या मागणीनुसार 27 जून 2024 पासून लोणावळा शहरामध्ये कायमस्वरूपी एकेरी वाहतूक सुरू करण्यासंदर्भातील जाहीर प्रकटन लोणावळा नगरपरिषदेने प्रसिद्ध केले आहे. तसेच जे वाहनधारक या एकेरी वाहतूक नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर लोणावळा शहर पोलिसांच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी बाजारभागातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी दोन्ही प्रशासनाला सहकार्य करावे व एकेरी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील लोणावळा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. वरील सूचनांचे पालन न केल्यास होणाऱ्या कारवाईला संबंधित वाहन धारक हे स्वतः जबाबदार असणार आहेत असे या प्रकटनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

अंमलबजावणी जरूर करा पण प्रथम अडथळे दूर करा

लोणावळा बाजार भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक हा पर्याय मागील काळात देखील यशस्वी झाला होता. आता देखील होईल मात्र याकरिता पुरंदरे शाळेसमोरील मार्गावरून जाताना रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनाचे अडथळे, दुचाकी गॅरेज मुळे व्यापला गेलेला रस्ता, तसेच अनेक टेम्पो व चारचाकी गाड्या या मार्गावर उभ्या रहात असल्याने होणारी कोंडी हे प्रश्न प्रथम सोडविणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी नदी पुल दरम्यान असलेले अंतर्गत जोड रस्ते येथून होणारा वन वे नियमभंग रोखण्यासाठी आवश्यक फलक व पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करणे देखील गरजेचे असल्याचे मत व मागणी लोणावळेकर करत आहेत. कारण या रस्त्यावरील वाहतूक अडथळ्यामुळे नागरिकांना आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत आहे. यामुळे अनेक वेळा एकेरी वाहतुकीचा भंग होतो. याबाबत अनेक तक्रारी सोशल मीडियातून वाचायला देखील मिळत आहेत. याकरिता नागरिकांची मते देखील विचारात घ्या अशी मागणी काही नागरिक करत आहेत.


इतर बातम्या