Breaking news

Lonavala News l हायकोर्ट कमिटी समोर खंडाळा तलाव व भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाबाबत चर्चा; त्या इमारतीच्या कामाची होणार चौकशी

लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतुकीचा ज्वलंत विषय असलेल्या व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा भाग असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच नांगरगाव भागात पुलाच्या खांबा शेजारी मागील वर्षभरात तयार झालेल्या इमारतीचा मुद्दा आज प्रामुख्याने हायकोर्ट कमिटी समोर उपस्थित करण्यात आला. तसेच खंडाळा तलावाला शासनाकडून निधी देण्यात आलेला असताना ते काम आजुन अर्धवट का राहिले आहे यावर चर्चा करण्यात आली. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी आज हायकोर्ट कमिटीची वेळ घेऊन हे दोन्ही मुद्दे त्यांच्यासमोर मांडले.

     बैठकीला कोर्ट कमिटी सदस्य मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉ. एस. राधाकृष्णन, निवृत्त मुख्य सचिव जगदीश जोशी, निवृत्त नगररचना संचालक व्ही. डब्ल्यू. देशपांडे, स्थानिक प्रतिनिधी तनु मेहता व दिनेश राणावत, 

मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपा शहराध्यक्ष अरुण लाड, गटनेते देविदास कडू, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी समितीसमोर लोणावळ्यातील ज्वलंत विषय असलेला भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल कामातील तांत्रिक अडचणी दूर करत त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली. सोबतच नांगरगाव बाजूला पुलाच्या खांबा लगत दोन वर्षापूर्वी लोणावळा नगर परिषदेने एका इमारतीला परवानगी दिली असून त्या कामामुळे पुलाचे काम बाधित होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. गटनेते देविदास कडू, बाळासाहेब जाधव, अरुण लाड यांनी या इमारतीचे फोटो समिती सदस्यांना दाखविले. तसेच ही परवानगी कशी देण्यात आली, याबाबत चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. लोणावळा शहराच्या दृष्टीने हा पुल होणे अतिशय गरजेचा असल्याने या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली. या कामात प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कमिटीने देखील सदर इमारतीबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

    खंडाळा तलावाच्या बाबतीत देखील शासनाने निधी दिलेला असताना काम रखडले आहे. येथे थेट नाला तळ्यात सोडण्यात आला असल्याने व दुर्षित पाण्यामुळे हजारो मासे मेल्याची गंभीर बाब माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी निदर्शनास आणून दिली. समितीने याबाबत तातडीने निर्णय घेऊन रखडलेले काम पूर्ण करण्याच्या तसेच नाला तळ्याच्या बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्याधिकारी साबळे यांनी या कामांचे टेंडर काढत कामे मार्गी लावण्याचे तसेच बोटिंग कामाचे देखील टेंडर काढणार असल्याचे सांगितले. तसेच लोणावळ्यातील समस्यांबाबत देण्यात आलेल्या निवेदनातील प्रत्येकी दोन विषयांवर दर मिटिंग मध्ये चर्चा करत, त्यांचा पाठपुरावा करूयात असे ठरवण्यात आले. सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी यांनी कमिटीने आजपर्यत काय कामे केली आहेत याची माहिती पत्रकार परिषद घेऊन द्या अशी मागणी केली.

देविदास कडू यांनी कोर्ट कमिटी व प्रशासनावर केली आगपाखड

कोर्ट कमिटी व प्रशासन शहरात कार्यरत असताना देखील कामे मार्गी लागत नसल्याने भाजपा गटनेते व भांगरवाडीचे नगरसेवक देविदास कडू यांनी आगपाखड केली. भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम अर्धवट आहे. त्यातच नांगरगाव बाजूकडे एक इमारत पुलाच्या कामात आली आहे. एक वर्षात ही इमारत उभी राहिली आहे. या कामाची चौकशी करा व दोषींवर कारवाई करा अशी मागणी केली. प्रशासक काम करत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. केवळ वेळखाऊ पणा न करता कामे करा असा शब्दात आगपाखड केली.

   

इतर बातम्या