Breaking news

Jakhmata Devi : तुंगार्ली गावचे ग्रामदैवत जाखमाता देवी

मावळ माझा न्युज नेटवर्क : तुंगार्ली गावाचे ग्रामदैवत असलेल्या जाखमाता देवीचे स्थान मागील शेकडो वर्षांपासून तुंगार्ली गावात आहे. चार वेळा या देवस्थान मंदिर जिर्णोद्धाराचे काम झाले आहे.

    इतिहासात तुंगारा नावाचा उल्लेख असणार्‍या गावाचे नंतर तुंगारली व कालांतराने तुंगार्ली असे नामकरण झाले असावे असे मानण्यात येते. मावकर, गोसावी व देसाई हे या गावचे मूळ रहिवासी आहेत. मावकर परिवारांची कुलदैवता असलेली जाखमाता देवी व कालातरांने संपुर्ण तुंगार्ली गावाची कुलदैवता म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थांनाची पुजा अर्चा व नित्यक्रम मागील काही पिढ्यांपासून मावकर परिवार करत आहे. दत्तोबा राणू मावकर (पाटील) सध्या जाखमाता देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

    आई जाखमाता देवी विषयी व तीच्या स्थानाविषयी फार माहिती उपलब्ध नसली तरी तुंगार्ली गावात देवीच्या 160 वा उत्सव साजरा होणार आहे. देवीचे पुर्वीचे स्थान हे सध्याच्या एचडीएफसी ट्रेनिंग सेंटरच्या आवारात आहे. तरी देवालय हे तुंगार्ली गावात आहे. फार पुर्वी ब्रिटिश राजवटीमध्ये एका इंग्रज अधिकार्‍याच्या पत्नीने बंगल्याच्या आवारातील देवीच्या मुर्ती नोकरांच्या हस्ते बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर तुंगार्ली ग्रामस्तांनी मावकर पाटलांच्या शेताच्या बांधावर त्या मुर्तीची स्थापना केली. आज देखील त्याच ठिकाणावर सदर मुर्ती असून काळानुरूप याठिकाणी मंदिरांचे जिर्णोद्धार होत गेले आहेत. नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून जाखमाता देवी सर्वश्रूत असल्याचे भाविक सांगतात. तुंगार्ली गावातील कोणतेही शुभकार्य हे देवीचा आर्शिवाद घेऊनच केले जाते. तसेच रंगपंचमीला देवीचा फार मोठा उत्सव भरतो, मावळातील भव्य दिव्य उत्सवात तुंगार्ली गावातील उत्सवाची गणना केली जाते. वर्षानुवर्षे या देवस्थानाची पुजाअर्चा व दिवाबत्तीची कामे मावकर परिवार करत आहे.

   पुर्वी राजा रजवाड्यांचे राज्य असताना मावकर व गोसावी घराण्यातील दोन पुरुषांविषयी अख्यायिका सांगितली जाते. त्यावेळी पराक्रमास पात्र ठरल्यास पुर्ण गाव इनाम दिले जाई. ठरल्याप्रमाणे पैज जिंकणार्‍याला इनाम म्हणून जमिन दिली जात असे. अशीच एकदा राजांनी गोसावी व मावकर घराण्यातील रायजी व पायजी या दोन पुरुषांमध्ये गावाच्या वेशीपासून जो जितका धावेल, त्याला तितकी जमिन अशी पैज लावली. दोघांनी खुप अंतर कापले व ते थांबेनात, त्यांना विरमरण आले. त्यांच्या पश्चात राजांकडून गोसावी भाऊबंदांना आरपीटीएस पासून शंकरनगर पर्यत व मावकर भाऊबंदांना तुंगार्ली गावाचा उर्वरीत भाग अशा स्वरुपात जमिन इमान बहाल करण्यात आली. ज्याठिकाणी वरील दोघांना वीर मरण आले. ते ठिकाण पायजीची जांभळ (जाखमाता उद्यान) या नावाने प्रसिद्ध आहे. त्याठिकाणी दोन्ही वीर पुरुषांच्या पाषणरुपी मुर्ती आहेत.

इतर बातम्या