Breaking news

Mumbai Pune Expressway | ठरलं तर मग | एक्सप्रेस वे वर घाट परिसरातील वेग मर्यादा व उर्वरित भागातील वेग मर्यादा झाली निश्चित

लोणावळा : जलद गती प्रवासाचा मार्ग म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. याबाबतची अधिसूचना अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुखविंदर सिंह यांनी आज 19 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे इथून पुढे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी या वाहतूक वेग मर्यादेचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून होणार आहे. 94 किलोमीटर अंतराच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सर्वत्र गॅन्टी उभारत त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मार्ग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये आला आहे.

      किमी क्रमांक 35.500 ते किमी 52.00 हा भाग घाट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर उर्वरित भाग हा समतल भाग म्हणून ओळखला जातो. ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह आठ प्रवासी वाहतूक करतात (एम 01 श्रेणीतील वाहने) अशा वाहनांसाठी समतोल भागामध्ये तासी वेग मर्यादा 100 किमी घाट क्षेत्रामध्ये 60 किमी अशी करण्यात आली आहे. ज्या प्रवासी वाहनांमधून चालकासह नऊ व त्यापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जाते. त्या वाहनांसाठी (एम 02 व  एम 03 श्रेणीतील वाहने) समतल भागामध्ये ताशी वेग 80 किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर अशी वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. मोटर वाणी ज्यांचा उपयोग माल व साहित्य वाहतुकीसाठी केला जातो (सर्व एन श्रेणीतील वाहने) यांच्यासाठी देखील समतल भागामध्ये वेग-मर्यादा ताशी 80 किलोमीटर तर घाट क्षेत्रामध्ये 40 किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे.

     एक्सप्रेस वेवर दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने व चार चाकी रिक्षा यांना वाहतुकीला पूर्वीप्रमाणेच बंदी घालण्यात आली आहे.

     सद्यस्थितीत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर समतल भागासाठी असलेली वेगमर्यादा 100 कि.मी. प्रति तास असून घाट भागामध्ये आल्यानंतर वेगमर्यादा 50 कि.मी. प्रति तास आहे. व्यवहारिक दृष्ट्या घाट भागातील नमुद वेग मर्यादा हलक्या वाहनांसाठी अत्यंत कमी असून पुणे ते मुंबई वाहिनीवर अति तीव्र उतार असल्याने, नमुद ठिकाणी वाहनांना समतल भागातून 100 कि.मी. प्रति तास या प्रमाणे प्रवास केल्यानंतर घाट भागात आल्यावर वाहनाची वेग मर्यादा 50 कि.मी. वर आणताना वाहन चालकांना अडचणी निर्माण होतात तसेच त्या दरम्यान2 वाहन चालकाने वाहनांचा वेग जलद गतीने कमी केल्याने अपघातांचे प्रमाण देखील अधिक असल्याचे दिसून आले आहे.

       यशवंतराव चव्हाण द्रुतगती (एक्सप्रेस वे) रस्त्याचे डिझाईन व घाट सेक्शनमध्ये झालेल्या रस्त्यांचे रूंदीकरण तसेच एमएसआरडीसी (MSRDC) कार्यालय पुणे, परिवहन विभाग, आयआरबी इंन्फा डेव्हलपमेंट कार्यालय, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस पनवेल विभाग, प्रभारी पोलीस निरीक्षक म.पो. केंद्र बोरघाट प्रमुख आरेखक वाहतुक अभियांत्रिकी पथक यांची 15 एप्रिल 2024 रोजी झालेल्या बैठकीतील बोरघाटातील वेग मर्यादे विषयीचे अभिप्राय विचारात घेता सर्वानुमते मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात हलक्या वाहनांच्या वेग मर्यादेत काहीसा बदल करण्यात आला असून त्याची अधीसुचना आज प्रसिध्द करण्यात आली आहे.

इतर बातम्या