Breaking news

Lonavala Good News : लोणावळ्यात आरोग्य मित्र फाऊंडेशनची स्थापना

लोणावळा : लोणावळा शहरातील वैद्यकीय गरज ध्यानात घेता आर्थिक कुवत नसलेल्या आणि शासकीय योजनांबाबत अनभिज्ञ असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन आणि मदत पुरवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत 'आरोग्य मित्र फाऊंडेशन' ची लोणावळ्यात स्थापना करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्याच्याच संकल्पनेतून हे फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे. काल 18 मार्च रोजी त्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. 

       भांगरवाडी येथील सुमित्रा हाॅलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीधर पुजारी यांनी आरोग्य मित्र फाऊंडेशन सुरु करण्यामागील भूमिका विषद केली. यावेळी माजी नगराध्यक्ष आणि फाऊंडेशनच्या सदस्य सुरेखा जाधव फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दिलीप आंबेकर, अभिजित गायकवाड, विशाल पाडाळे, राजु खंडेलवाल, विकी पारलेचा, अनिल गायकवाड, हर्षल होगले, आशिष बुटाला, डी. डी. शिंदे, शौकत शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.

    या संस्थेविषयी बोलताना पुजारी म्हणाले, लोणावळा शहर आणि परिसरातील आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गोरगरीब तसेच आदिवासी नागरिकांना योग्य असे वैद्यकीय मार्गदर्शन मिळत नसल्याने ते आजार अंगावर काढतात. अनेक वेळा आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याची उदाहरणे आहेत. याकरिता सर्वसामान्यांना अत्यल्प दरातील उत्कृष्ट वैद्यकीय उपचार वेळेत मिळावे, वैद्यकीय मदतीसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांना मिळावा यासाठी  'आरोग्य मित्र' सातत्याने प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी लोणावळा शहरात संस्थेचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णसेवेचा वसा घेऊन कार्य करीत असताना नागरिकांसाठी वेळोवेळी मोफत वैद्यकीय आणि मार्गदर्शन शिबिर, रक्तदान शिबिर यांचे आयोजन करणे, रुग्णवाहिका सेवा पुरवणे, अत्यल्प दरात विविध वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून देणे, योग तसेच गर्भसंस्कार शिबिरांचे आयोजन करणे, स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देणे ही काम 'आरोग्य मित्र' द्वारे करण्यात येणार असल्याचे पुजारी यांनी सांगितले. अनिल गायकवाड म्हणाले बुवांची मिसळ यांच्या वतीने ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिका चालवली जात आहे. शहरात पाच किमी अंतरात मोफत तर त्यापुढील प्रवासासाठी केवळ इंधन टाकत रुग्णवाहिका मोफत काम करत आहे. कोणाला आवश्यकता असल्यास निश्चितपणाने संपर्क साधावा. शौकत शेख म्हणाले आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आतापर्यंत अनेक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णांनी अथवा नातेवाईकांनी आमच्याशी संपर्क साधत उत्पन्नाचा दाखल, आधारकार्ड असे आवश्यक कादगपत्रे दिल्यास आमची टिम पुढील कार्यवाही करत त्यांना मोफत वैद्यकीय सेवा व शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात मोफत देत आहे. फाऊंडेशनच्या स्थापना प्रसंगी श्रीधर पुजारी यांनी 1 लाख रुपयांची देणगी, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी 51 हजार, ज्येष्ठ नागरिक संघ 5 हजार, पार्वती रावळ 5 हजार, जाकिर खलिफा 11 हजार अशा देणग्या जाहीर करण्यात आल्या. विशाल पाडाळे यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.

इतर बातम्या