Breaking news

Lonavala News l लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरण कामास सुरुवात

लोणावळा : लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसराच्या सुशोभीकरण कामास 22 जून पासून सुरुवात करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून या सुशोभीकरण कामासाठी लोणावळा नगरपरिषदेने ठराव केल्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हे काम सुरू झाले नव्हते. तीन महिन्यांपूर्वी या कामासाठी आवश्यक असणारा निधी व तांत्रिक मंजुरी या कामाला मिळाली होती. मावळचे आमदार सुनील शेळके माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या पाठपुराव्यातून 19 फेब्रुवारी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाला 22 जून रोजी प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी देखील या कामासाठी उपोषणे केली होती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने घंटा मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, हिंदू समिती या सर्वांचे प्रयत्न व पाठपुराव्याने कामाला सुरुवात झाली असून ठेकेदाराने वेळेत दर्जेदार काम पूर्ण करावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

     छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व परिसर सुशोभीकरण कामासाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरचे काम हे मे. ग्रीनलॅन्ड कंपनीकडून करण्यात येणार आहे. कामासाठी 300 दिवसांची मुदत असणार आहे. या 300 दिवसात सदरचे काम मंजूर नकाशे प्रमाणे पूर्ण करायचे आहे. या कामाला 22 जून रोजी सुरुवात करण्यात आली असून पावसाळ्यात जमिनीची लेव्हल व इतर फाउंडेशन कामे केली जाणार असल्याने मे. ग्रीनलॅन्ड कंपनी कडून सांगण्यात आले. दरम्यान हे काम कशा पद्धतीने होणार आहे याचे संकल्प चित्र कामाच्या ठिकाणी लावावे अशी देखील मागणी पुढे आली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा कामाला सुरुवात

लोणावळा नगर परिषदेचे आवारात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याच्या कामाला 20 जूनच्या प्रशासकीय ठरावानुसार सुरुवात झाली आहे. सदरचे काम हे सुध्दा मे. ग्रीनलॅन्ड असो. यांच्या मार्फत केले जाणार आहे. या कामासाठी 11 लाख 90 हजार रुपये खर्च अपेक्षित असून कामासाठी 180 दिवसांची मुदत असणार आहे. 

इतर बातम्या