Lonavala News l लोणावळा धरणातील कानिफनाथ मठात ओम चैतन्य कानिफनाथ महाराजांचा उत्सव आनंदात साजरा

लोणावळा : रंगपंचमीच्या निमित्ताने लोणावळ्यातील टाटा धरण परिसरात असलेल्या कानिफनाथ महाराज मठात वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मागील 61 वर्षांपासून सातत्याने हा सोहळा येथे पार पडतो. यंदाही भुशी गावातील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम मराठे, माजी नगरसेवक माणिक मराठे, रतन मराठे, अजय मराठे आणि त्यांचा मराठे परिवार तसेच ओम चैतन्य श्री कानिफनाथ मित्र मंडळ भुशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
या पवित्र सोहळ्याला लोणावळा तसेच परिसरातील गावांमधून हजारो भाविकांनी गर्दी केली. सकाळी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक, होम आणि सत्यनारायण पूजा यांसारखे धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी 12.30 वाजता महाआरती संपन्न झाली. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सायंकाळी मंदिर परिसरात दर्शनासाठी गर्दीचा ओघ आणखीनच वाढला. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या मठाच्या आसपास हिरवीगार झाडी असल्याने भाविकांनी तिथे शांततेचा व निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. या सोहळ्यानिमित्त मराठे परिवाराने मठ परिसराची विशेष स्वच्छता केली तसेच मंदिराला रंगरंगोटी करून सजवण्यात आले.
मावळ परिसरातील अनेक गावांमधून पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. संपूर्ण दिवस भक्तिरसात चिंब झालेल्या या सोहळ्याची सांगता सायंकाळच्या महाप्रसादाने झाली. भाविकांच्या उपस्थितीमुळे मठ परिसर चैतन्यमय झाला होता.