Breaking news

अग्निपथावरचा वाटसरु - बाबू पोटे

खोपोली (गुरुनाथ साठेलकर) : लोखंडाचे घाव सोसत आयुष्याच्या निखार्‍यात स्वतःला प्रज्वलीत करणारा अग्निपथावरील वाटसरु म्हणजेच ज्येष्ठ पत्रकार बापू सिताराम पोटे. वयाच्या पन्नासीकडे झुकलेल्या बाबू पोटे यांच्या साधारण अर्ध्या आयुष्याच्या वाटचालीचा वस्तुपाठ मी जवळून पाहिला आहे आणि त्या पूर्वीच्या त्यांच्या आयुष्याचा आढावा जेंव्हा मी घेतो तेंव्हा,  ते "अग्निथावरचे वाटसरु आहेत" असे अनुमान काढताना मला अतिशयोक्ती केल्याचे जाणवत नाही.

     "जन्माला यायचं कोणाच्या हातात नसतं मात्र जन्माला आल्यानंतर काय व्हायचं हे ठरवता येतं".  ही वस्तुस्थिती आहे, असे असताना बाबू पोटेंच्या आयुष्यात कित्येक प्रसंग येतात आणि त्यात त्यांच्या निग्रहाच्या चिंधड्या उडतात.  अठरा विश्वे गरिबी झेललेल्या कुटुंबात त्यांचा जन्म होतो. अवघ्या आठव्या वर्षी आई त्यांना सोडून देवाघरी जाते, हसण्या बागडण्याच्या वयात चौदाव्या वर्षी बाबांचं देहावसान होतं. आठवीनंतर शाळेची पायरी चढता येत नाही. अश्यात सख्या नात्याचे कोणीही नसताना एकाकी आयुष्य सुरु होतं. या नंतरच्या खडतर जीवन प्रवासात प्रत्येक पावलावर संघर्ष उभा ठाकतो… तेंव्हा त्यांना "अग्नीपथावरचा वाटसरु" म्हणणेच उचित वाटत नाही का ? त्या अगनिपथावर मार्गक्रमण करत असताना तावूनसुलाखून निघालेलं, टक्केटोणपे खाल्लेलं, ठेचकाळलेलं, नियतीने गलितगात्र केलेलं बाबू पोटे यांचं अस्तित्व सुवर्ण झळाळी घेईल, असे नियतीला देखील वाटले नसेल. छोट्या-मोठ्या साप्ताहिकातून  आणि वर्तमानपत्रातून आपल्या लेखणीने बातम्यांना आयाम देत असताना, त्याच अनुभवाच्या पायावर संवाद मराठी सारख्या वृत्तवाहिनीचा डोलारा उभा करत बाबू पोटे संपादक होतो... याला सुवर्ण झळाळी म्हणायचे नाही तर अजून काय म्हणणार ?

      बाबू पोटे यांनी परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी शिक्षणाची कास सोडली,  मात्र त्यांनी आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिलं. छंद म्हणून स्वीकारलेल्या पत्रकारितेला त्यांनी व्यवसायाचे स्त्रोत म्हणुन दर्जा दिला. आपलं वेगळं साम्राज्य निर्माण केलं. आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या रेषांना एकत्र करुन त्याची चौकट न करता त्या रेषांनी यशाचे चित्र त्यांनी रेखाटेले आहे. सर्वच क्षेत्रांत रस घेऊन पत्रकारिता करतांना कोणाच्याच मैत्रीच्या धाग्याची विण त्यांनी कधी सैल होऊ दिली नाही. माझ्या सारख्यांसोबत त्यांचे खटके उडतात, मतभेद होतात, दुरावा येतो मात्र त्यात दिर्घता नसते. आज बाबू पोटे यांची पत्रकारितेतली पंचवीस वर्षे पूर्ण होत असताना त्यांचा वाढदिवस असावा हा अभूतपूर्व दुग्धशर्करा योग त्यांच्या आयुष्यात आला आहे. 

इतर बातम्या