सिद्धी योग अँड हेल्थ फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मावळ माझा न्युज नेटवर्क : सिद्धी योग अँड हेल्थ फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत 20 व 21 जून 2025 रोजी विविध योग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे योगसाधना, भक्तीयोग, कॉर्पोरेट व तरुणाईतील योगप्रसार आणि ध्यानधारणा यांचा प्रभावी संगम साधण्यात आला.
या योग दिन उपक्रमाची सुरुवात 20 जून रोजी भोर येथे 'योग विद्या धाम, भोर शाखा' व पंचायत समिती भोर यांच्या सहकार्याने पार पडली. दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 21 जून रोजी वारकरी संप्रदायाच्या सहभागाने 'भक्ती योग' साधना करण्यात आली. भजन, कीर्तन आणि योगासने यांच्याद्वारे भक्तिभाव आणि मानसिक समाधान यांचा संगम अनुभवता आला.
त्यानंतर स्कायलार्क इन्स्टिट्यूट, आर्वी (खेड शिवापूर) येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत योग सत्र पार पडले. तरुण विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमात नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली. तिसरे सत्र रविस्मा कॉर्पोरेट व्हेंचर, पुणे येथे पार पडले. या ठिकाणी 'चेअर योग', 'ऑफिस योग' आणि 'तणाव व्यवस्थापन तंत्र' यावर आधारित सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामुळे व्यावसायिकांसाठी योगाच्या माध्यमातून आरोग्य सुधारणा आणि मानसिक शांतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरले.
या दोन दिवसीय उपक्रमाचा समारोप सिद्धी योगच्या पुणे येथील मुख्य केंद्रात शांत ध्यान सत्राने झाला. अंतर्मुखतेने भारलेले हे सत्र सहभागींसाठी मनःशांतीचा अनुभव देणारे ठरले. या यशस्वी आयोजनानंतर फाउंडेशनचे अरुण येवले, सरोज येवले आणि सिद्धी येवले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “भारत सरकारच्या ‘वन अर्थ, वन हेल्थ’ या संकल्पनेला अनुसरून योग दिन साजरा करताना आम्हाला समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा आनंद मिळाला.”