Breaking news

झेनिथ धबधब्याजवळील अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना सुरू

खोपोली : पावसाळा सुरु होताच पर्यटकांची झेनिथ धबधब्याकडे ओढ वाढते. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी यंदा सुरुवातीलाच प्रशासन, पोलीस व सामाजिक संस्थांनी मिळून प्रतिबंधात्मक उपाययोजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे.

     खोपोली नगरपरिषद, खोपोली पोलिस स्टेशन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सामाजिक संस्था 'HELP Foundation' यांच्या संयुक्त पुढाकारातून सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. पावसाळ्याच्या प्रारंभीच या प्रयत्नांना गती मिळाली आहे.

     दरवर्षी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडून काही पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी लागू केली जाते, मात्र असे आदेश डावलून अनेक पर्यटक धबधब्याच्या परिसरात गर्दी करताना दिसतात. त्यामुळे यंदा संभाव्य धोक्याचा विचार करून आधीच आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली.

सुरक्षा उपाययोजना:

  • झेनिथ धबधब्याच्या वाटेवर अग्निशमन दलाच्या मदतीने रोप बॅरिकेडिंग लावण्यात आले आहे.
  • पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी खोपोली पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे.
  • मद्यधुंद अवस्थेत कोणीही धबधब्याच्या परिसरात प्रवेश करू नये यासाठी कडक नजर ठेवली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक शितल राऊत यांनी सांगितले.

डिजिटल माहिती आणि आपत्कालीन मदत:

पर्यटकांना आवश्यक संपर्क क्रमांक, स्थानिक मदत केंद्रांची माहिती QR कोडच्या माध्यमातून दिली जाणार आहे. धोक्याच्या प्रसंगी तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशिक्षित रेस्क्यू टीम झिरो अवर्समध्ये घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती ‘HELP Foundation’ कडून देण्यात आली आहे. संपूर्ण यंत्रणा संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज असून, पर्यटकांनीही नियमांचे पालन करून सुरक्षित पर्यटनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या

कोकणातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ. शेखर निकम यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीची भेट; चिपळूण शहरातील विविध समस्या बाबतही दिले निवेदन