Breaking news

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त लोणावळ्यात वरघोडा मिरवणूक व विविध कार्यक्रमांचे आयोजन

लोणावळा : जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त लोणावळा शहरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ आणि वर्धमान जैन स्थानकवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने रांगोळी स्पर्धा, थाळी सजावट स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि विजेत्यांना आयोजकांच्या वतीने गौरवण्यात आले. सकाळच्या सत्रात सामूहिक नवकार मंत्र पठण, भजन आणि साध्वी प्रगती महाराज साहेब यांचे प्रेरणादायी व्याख्यान पार पडले.

गावठाण येथील जैन मंदिरापासून सुरु झालेल्या भव्य वरघोडा मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजी मंडई, एबीसी कंपनी समोरून नवा बाजार आणि जयचंद चौक मार्गे पुन्हा गावठाण मंदिर गाठले. या मिरवणुकीत जैन बांधवांसह लोणावळा शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला. दुपारच्या सत्रात महिलांच्या वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाचे मॅनेजिंग ट्रस्टी गिरीशभाई शहा, मांगीलाल ओसवाल, ललित ओसवाल, संदीप शहा, नितीन शहा, महेंद्रा ओसवाल, प्रवीण बोराणा, प्रदीप पत्रावाला, रवींद्र भंडारी, रमेश राठोड, करण ओसवाल, मुकुंद शहा, राकेश जैन, केविन पत्रावाला, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल ओस्तवाल, कार्याध्यक्ष सुभाष सांकला, सचिव संतोष चोरडिया, उपाध्यक्ष संतोष सुराणा, आशिष लुणावत, किशोर पारख, जितेंद्र छल्लानी, विनोद लुंकड, दिनेश गांधी यांच्यासह विविध मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते तसेच अनेकांनी कार्यक्रम स्थळी भेटी देत भगवान महावीर यांचे दर्शन घेतले.

इतर बातम्या