Shree Hanuman Janmotsav l लोणावळा शहर व परिसरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा : लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात सर्वत्र श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव मंडळांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्त करण्यात आले होते.
लोणावळा शहराच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर उंच गुफेमध्ये श्री हनुमान मंदिर आहे. हनुमान टेकडी मंदिर म्हणून ओळख असलेल्या या मंदिरामध्ये पहाटेच्या सुमारास पूजा व तदनंतर आरती करण्यात आली. पहाटेपासूनच भाविकांनी या डोंगरावर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने या निमित्त हनुमान टेकडी येथे विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे दुपारच्या सुमारास महाप्रसाद भंडारा पार पडला. इंद्रायणी नदी लगत असलेल्या श्री हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून या ठिकाणी देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भांगरवाडी येथील हनुमान मंदिर व रेल्वे गेट शेजारील हनुमान मंदिर या ठिकाणी देखील भाविक दर्शनासाठी येत होते.
लोणावळा गावठाण येथील हनुमान मंदिर येथे गावठाण व बाजारभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. खंडाळा येथील हनुमान मंदिरात देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत गिरीजा हॉटेल शेजारी असलेल्या मारुती मंदिरात वाटसरू व स्थानिक नागरिक हे दर्शनासाठी येत असल्याने या परिषदेत देखील मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागात कुसगाव येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावो उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर या ठिकाणी विविध कार्यक्रम यानिमित्त होणार आहेत. या सोबतच ग्रामीण परिसरामध्ये प्रत्येक गावात हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच हनुमंत रायाला रुईच्या पानांचा हार व तेल अर्पण करण्यासाठी भाविक सर्वत्र जात असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.