Lonavala News l लोणावळ्यात इंद्रायणी नदीपात्र स्वच्छता व जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात

लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या वतीने इंद्रायणी नदीपात्रामध्ये जलपर्णी काढण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने सदर स्वच्छता मोहीम व जलपर्णी काढण्याच्या कामाला कैलासनगर स्मशानभूमी येथून सुरुवात केली आहे.
पुणे जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या इंद्रायणी नदीची लोणावळा येथील उगमस्थानीच दुरवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी पसरली असून, अनेक ठिकाणी सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. अनेक भाविक आळंदी व देहू येथे इंद्रायणी नदीत स्नान करून आपले जीवन धन्य मानतात. मात्र, त्याच पवित्र नदीची लोणावळा शहरात झालेली दुर्दशा पाहून “हीच ती इंद्रायणी?” असा प्रश्न स्थानिकांसह पर्यटकांच्या मनात निर्माण होतो.
इंद्रायणी नदीचा उगम कुरवंडे गावाजवळील नागफणी टेकडीपासून होतो. एक आख्यायिका अशी आहे की, इंद्रदेवाच्या कमंडलूमधून सांडलेल्या पाण्यापासून या नदीची उत्पत्ती झाली. टाटा कंपनीचे लोणावळा धरण देखील याच नदीवर बांधण्यात आले असून, या धरणाच्या भिंतीपासून इंद्रायणीचे पात्र सुरू होते. नगरपरिषदेच्या हद्दीत साधारण ३-४ किलोमीटर अंतर या नदीचे पसरले आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मात्र यंदा पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असतानाही जलपर्णी हटवण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या वृत्ताची दखल घेत लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सदरची जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेले भुयारी गटर योजना व ड्रेनेज लाईनचे काम अंतिम टप्प्यात असून ते येत्या काही दिवसात ते पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रामध्ये जाणारे मैला मिश्रित पाणी व गटाऱ्याचे पाणी पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे नदीपात्रात होणारे प्रदूषण देखील कमी होणार असून त्याचा परिणाम दाखल जलपर्णी वाढण्याचे प्रमाण देखील निश्चितच कमी होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.