हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भांगरवाडी परिसरातील हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण

लोणावळा : श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भांगरवाडी परिसरातील हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्यात आले आहे. भाजपाचे गटनेते व भांगरवाडी विभागाचे नगरसेवक देविदास कडू यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून ही कामे करून घेतली आहेत.
याविषयी बोलताना देविदास कडू म्हणाले, हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त भांगरवाडी भागातील हनुमान मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक व परिसरातील नागरिक दर्शनासाठी येत असतात. येथे येणाऱ्या भाविकांना दर्शनाची चांगली सवय व्हावी त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जावी या दृष्टिकोनातून नगर परिषदेच्या माध्यमातून या तीनही मंदिर परिसरामध्ये स्वच्छता करून घेण्यात आली आहे तसेच निर्जंतुकीकरण व पावडर फवारणी करून घेण्यात आली आहे. त्यामुळे मच्छर व इतर कीटकांचा त्रास भाविकांना होणार नाही असे त्यांनी सांगितले.
भांगरवाडी इंद्रायणी पूल येथील हनुमान मंदिराचा परिसर व रस्ता, दामोदर कॉलनी येथील हनुमान मंदिराच्या परिसरातील गवत व झाडेझुडपे काढत त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली असून परिसरात पावडर फवारणी करण्यात आली आहे. भांगरवाडी रेल्वे गेट या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिर परिसरातील गवत व झाडेझुडपे काढत त्या ठिकाणी देखील स्वच्छता व पावडर फवारणी करण्यात आली असल्याचे देविदास कडू यांनी सांगितले.