Dr. Babasaheb Ambedkar Jayanti l लोणावळ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम सैनिक मोठ्या संख्येने दाखल

लोणावळा : भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोणावळ्यात आज सकाळपासूनच भीम सैनिकांनी मोठी गर्दी केली होती. विविध गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक लोणावळा नगरपरिषद आवारामध्ये असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व समूह शिल्पांना अभिवादन करण्यासाठी येत होते. सर्वसामान्य नागरिकांसोबतच लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते शासकीय अधिकारी यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प माला अर्पण करत जयंतीनिमित्त अभिवादन केले. भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन लोणावळा शहरांमध्ये केले आहे. मावळ तालुक्यामधील सर्वात मोठा जयंती महोत्सव लोणावळा शहरांमध्ये साजरा केला जातो.
विविध गावांमधून तरुण कार्यकर्ते व महिला यांनी मिरवणूक काढत त्या लोणावळा शहरांमध्ये आणल्या होत्या. मावळा पुतळा, चौक जयचंद चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या पूर्ण परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा सफेद व निळ्या रंगाच्या झालर लावण्यात आल्या होत्या. तसेच घोषणाही करण्यात आल्याने संपूर्ण बाजारपेठेचा परिसर हा उजळून गेला होता. रात्री बारा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना व भीमवंदना करण्यात आली. आज सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वांसाठी अन्नदान ठेवण्यात आले होती. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. तर आतिश अडसुळे व मित्र परिवाराच्या वतीने सरबत वाटप करण्यात आला. लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने जयंती महोत्सवाच्या निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त लोणावळा शहरांमध्ये व मार्गावर जागोजागी तैनात करण्यात आला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व समोर शिल्प परिसरामध्ये आकर्षक पद्धतीने फुलांचे डेकोरेशन करण्यात आले होते.