स्नेहबंध मेळावा | DYSP बी.आर. पाटील यांच्या सेवा निवृत्ती निमित्त मांढरे गावात स्नेहबंध व जिव्हाळा मेळावा संपन्न
![](../images/original/1705238529931.jpg)
मावळ माझा न्युज (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस उप अधीक्षक (DYSP) बी.आर. पाटील यांच्या सेवा निवृत्ती निमित्त करवीर तालुक्यातील मांढरे गावात (कोल्हापूर) स्नेहबंध व जिव्हाळा मेळाव्याचे आयोजन 12 जानेवारी रोजी करण्यात आले होते. बी.आर. पाटील यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे हजारो नागरिक या मेळाव्यात सहभागी झाले होते. विविध गावांमधून नागरिक बी.आर. पाटील यांना भेटण्यासाठी व त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यामध्ये अबाल वृद्धांसह, ग्रामस्थ व मुले देखील मोठ्या संख्येने होती.
मांढरे गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात आहे. शहरापासून जवळपास 27 किमी अंतरावर हे गाव असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय. आता या गावात रस्ते, लाईट या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र ज्या काळात या गावात शेती हेच एक उपजीविकेचे साधन होते व एकंदरित सर्वच परिस्थिती अतिशय बेताची होती. शिक्षणाची देखील सुविधा उपलब्ध नव्हती, त्या काळात परिस्थितीवर मात करत बी.आर. पाटील म्हणजेच भगवान रामचंद्र पाटील यांनी शिक्षणाची कास धरली. आजी व घरातील इतर व्यक्ती बहिणी यांनी बी.आर. यांना पाठबळ दिले. बी.आर. पाटील यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण करत काही काळ शिक्षक म्हणून काम केले. हे करत असताना ते स्पर्धा परीक्षा पास होऊन पोलीस दलात दाखल झाले. घरची परिस्थिती बेताची असली तरी घरी आलेल्या कोणालाही उपाशी पोटी जाऊ न देणारी त्यांची आजी यांचे गुण बी.आर. पाटील यांनी घेतले असे गावकरी व त्यांचे नातेवाईक सांगतात.
परिस्थितीवर मात करत पोलीस दलात दाखल झालेल्या बी.आर. पाटील यांनी आपले कौशल्य पणाला लावत पोलीस खात्यात कामाच्या माध्यमातून आपला दबदबा निर्माण केला. म्हणूनच त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले. यासह त्यांनी शेकडो नव्हे तर उत्कृष्ट कामाबद्दल हजारो बक्षिसे मिळवली आहेत. त्यांच्या गावी सेवा निवृत्ती समारंभात लावलेली ही बक्षिसे, प्रशंसापत्रके व प्रमाणपत्रे तसेच मोठ्या नेत्यांनी दिलेली शाबासकी पत्रके यांचे दालन लावण्यात आले होते. मंदिराच्या एक बाजूला लावण्यात आलेले हे दालन येणाऱ्या प्रत्येकाला आचंबित करणारे होते. परिसरात जागा कमी पडेल एवढी ही पदके व बक्षिसे त्यांनी मिळवली आहेत. खरंतर बी.आर. पाटील यांनी बक्षिसांच्या सोबत जिवाभावाची माणसं या सेवा काळात मोठ्या प्रमाणात कमावली. अनेक वेळा शिकून मोठी झालेली माणसं यांची शहरात गेल्यावर गावाकडची नाळ तुटते. बी.आर. पाटील मात्र त्याला अपवाद आहेत. पोलीस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी आपण ज्या गावातून आलो आहे त्या गावासाठी काहीतरी करायचे याकरिता तेथील मुले, ग्रामस्थ, शाळा या सर्वांसाठी तसेच घरातील सदस्य यांच्यासाठी काम करत त्या सर्वांना सावरण्याचा प्रयत्न केला, सेवा निवृत्ती कार्यक्रमात देखील त्याचा प्रत्यय आला. बी.आर. पाटील नेहमी म्हणतात, पैसा तर कोणीही कमवू शकतो, मात्र जिवाभावाची माणसं कोठून भेटणार, मी देखील पैसा कमवून मोठा झालो असतो, मात्र जेव्हा मी मागे वळून बघितलं असतं तर मला अंधार दिसला असता. मी एकटा मोठा होऊन चालणार नाही, माझ्या सोबत माजी जिवाभावाची लोक देखील हवीत. असे घरातील लोकांवर व गावावर जिवापाड प्रेम करणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे बी.आर. पाटील ज्यांना समजले ते सर्व या स्नेहबंध मेळाव्यात सहभागी झाले होते. 3 हजाराहून अधिक नागरिक मांढरे गावात या सोहळ्यासाठी एकत्र जमले होते.
पोलीस दलात काम करत असताना बी.आर.पाटील यांनी कराड, कोल्हापूर, सातारा, लोणावळा या भागात आपल्या कामाचा ठसा उमटविला. कराड येथील हिंदू मुस्लिम समाजातील दंगली नियंत्रणात आणत, दोन्ही समाजात सलोखा निर्माण केला. लोणावळ्यात सेवा बजावत असताना तेथील वाहतूक कोंडीला शिस्त लावली. पर्यटकांना सेवा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याकरिता स्वतः चौकात उभा राहणारा पोलीस अधिकारी लोणावळाकरांनी पाहिला. नागरिकांमध्ये जिव्हाळा निर्माण केला. केवळ गुन्हे दाखल करून गुन्हेगारी कमी होत नाही. गुन्हेगारांचे प्रबोधन करून देखील गुन्हे कमी करता येतात. असे त्यांनी केवळ सांगितले नाहीतर कृतीतून करून देखील दाखवले. सेवा काळात त्यांनी अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले. गुन्हेगाराला होणारा पश्चाताप हा त्याला दिलेल्या कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठा असतो, ती पश्चयातापाची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्यास वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागत नाही असं ते नेहमी सांगतात. भीमा कोरेगाव येथील दंगलीच्या नंतर त्याबाबतची सर्व माहिती व त्याचे लिखाण करत त्याचे सादरीकरण करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. शेवटचे काही दिवस त्यांनी कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहिले. लोणावळ्याचा कार्यकाळ संपल्यानंतर कराडकरांनी शासन दरबारी साकडे घालत बी.आर. यांची बदली पुन्हा कराड ला करून घेतली होती. असे भाग्य फारच कमी अधिकाऱ्यांच्या नशिबी येतं.
सेवा निवृत्ती नंतर कोल्हापूर भागात एक ओल्ड एज्ज व्हिलेज उभारण्याचा त्यांचा मानस असून उर्वरित आयुष्य त्यासाठी खर्ची घालवण्याचा मनोदया त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या उर्वरित आयुष्याला व वाटचालीला मावळ माझा न्युज परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा !!!