Breaking news

यापुढे लोणावळ्यात बंगले भाड्याने दिल्यास गुन्हे दाखल करा - प्रांत संदेश शिर्के (सार्वजनिक ठिकाणी व सर्व हाॅटेलांच्या बाहेर पर्यटनबंदीचे फलक लावा)

लोणावळा : लोणावळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक वाढत असताना खाजगी बंगले मोठ्या प्रमाणात पर्यटकांना भाड्याने दिले जात असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. शासनाचा पुढिल आदेश होईपर्यत कोणी बंगले भाड्याने दिल्यास बंगलाधारक व त्याठिकाणी आलेले या सर्वांवर गुन्हे नोंद करा असा आदेश मावळचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिला आहे. तसेच लोणावळा परिसरात पर्यटनबंदी असल्याने सार्वजनिक ठिकाणी व सर्व हाॅटेलाच्या बाहेर लोणावळ्यात पर्यटनबंदी असल्याचे फलक लावण्यात यावेत असे प्रांत शिर्के यांनी सांगितले.

  लोणावळा शहरातील कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी प्रांत शिर्के यांनी लोणावळा नगरपरिषदेत आज सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवी पवार, तालुका आरोग्य विभागाचे डाॅ. गुणेश बागडे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

  यावेळी बोलताना प्रांत शिर्के म्हणाले सध्या सर्वत्र कोरोनाचा उद्रेक पहायला मिळतो आहे. येणारा काळ फार भयंकर असणार आहे. लोणावळा शहर हे पर्यटनाचे शहर असल्याने येथील कोरोनाची साखळी तोडणे फार गरजेचे आहे. याकरिता नगरपरिषदेने स्वँब कलेक्शन केंद्र वाढविण्याची गरज आहे. शहरातील कोमार्बिड रुग्णांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करावी. ज्या भागात रुग्ण सापडतात, त्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांची स्वँब तपासणी करण्यात यावी. कोविड केअर सेंटरमध्ये स्वँब देण्यासाठी जायला नागरिक घाबरतात, याकरिता शहरातील मध्यवर्ती भागात स्वँब कलेक्शन केंद्र (कॅम्प) तयार करा व स्वँबनंतर अहवाल येईपर्यत नागरिकांना दुसरीकडे विलगीकरण करून ठेवा. अहवाल पाॅझिटिव्ह आला तर कोविड केअर सेंटरला रुग्ण पाठवावे अन्यथा होम आयसोलेट होण्याचा सल्ला द्यावा. नगरपरिषदेचे तपासणी पथक देखील अँक्टिव करत जास्तीत जास्त तपासण्या कशा होतील यावर लक्ष केंद्रित करावे असे सांगितले. शहरात जागा उपलब्ध झाल्यास नविन कोविड केअर सेंटरला देखील मान्यता देऊ असे सांगितले. शहरातील रुग्णांना शहरातच उपचार मिळावा याकरिता अतिरिक्त डाॅक्टर व नर्स यांची टिम उपलब्ध झाल्यास संजीवनी रुग्णालयात आजून 50 बेडची तसेच व्हेंटिलेटरची सोय करण्याची तयारी डाॅ. अमोल आगरवाल यांनी दर्शवली. यावेळी नगरसेवकांनी त्यांच्या समस्या प्रांतासमोर मांडल्या. भाजपा गटनेते देविदास कडू यांनी शहरातील पर्यटकांची वाढती गर्दी रोखण्यासाठी शनिवार व रविवार लोणावळा बंद ठेवण्याची सूचना केली. येत्या दोन तीन दिवसात तोलानी व आजून काही ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे शिर्के यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी जनजागृती करावी

लोकप्रतिनिधींनी आपआपल्या प्रभागात जनजागृती करत कोमार्बिड रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांची कोरोना तपासणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तसे आवाहन नागरिकांना करावे असे प्रांत संदेश शिर्के यांनी सांगितले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा इतिहास पाहता वय, कोमार्बिड व उशिरा उपचार या तीन कारणांमुळे ते झाले असल्याचे दिसून येते, हा मृत्यूदर कमी करायचा असल्यास लक्षणे दिसताच उपचार घ्या असे आवाहन त्यांनी केले.

यापुढे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचा लोणावळ्यातच अंत्यविधी 

लोणावळा शहरातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांचा अंत्यविधी लोणावळा शहरातच केला जाणार असल्याचे प्रांत संदेश शिर्के यांनी सांगितले. त्याकरिता लोणावळा शहरातील दोन स्मशानभूमीची चाचपणी करण्यात आली असून लाॅटरी पद्घतीने त्यापैकी एक स्मशानभूमी निश्चित करण्यात येईल असे प्रातांनी सांगितले.

नागरिकांना सुविधा देण्यास नगरपरिषद तत्पर

लोणावळा शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यास लोणावळा नगरपरिषद सदैव तयार आहे. करोडो रुपये खर्च झाला तरी चालेल मात्र नागरिकांना सुविधा देण्यास नगरपरिषद मागे हटणार नाही असे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी सांगितले. नागरिकांच्या सुविधेसाठी आजून सिसीसी केंद्र, स्वँब कलेक्शन सेंटर सुरू करणार असून एक रुग्णवाहिका नगरपरिषद घेत आहे तसेच सिसीसीसाठी अतिरिक्त डाॅक्टर घेण्याची नगरपरिषदेची तयारी असल्याचे जाधव व पुजारी यांनी सांगितले.




इतर बातम्या

वसंत व्याख्यानमाला | कारगिल टायगर हिल्सवर 150 जणांच्या विरोधात आम्ही 7 जण लढलो, डोळ्यातून - नाकातून रक्त गळत होते, अंगभर गोळ्या होत्या मात्र लढण्याची जिद्द व आत्मविश्वास कायम होता - परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह याद