पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरातील नाले व नदीपात्र स्वच्छता पूर्ण करा; खड्ड्यांचे पॅचवर्क काम तातडीने मार्गी लावा - लोणावळा काँग्रेस

लोणावळा : लोणावळा शहरांमधील सर्व नाले व नदीपात्राची स्वच्छता पावसाळा सुरू होण्यापूर्वी करून घ्या तसेच रस्त्यांवर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते सर्व पॅचवर्कची कामे तातडीने मार्गी लावा अशी मागणी लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. लोणावळा शहरातील विविध कामांपैकी मुख्य कामांकडे लक्ष वेधण्यासाठी लोणावळा शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ आज लोणावळा नगरपरिषदेमध्ये आले होते. उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करत मागण्याची निवेदन त्यांना सादर केले आहे.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने -
- लोणावळा शहरांमधील पावसाचे प्रमाण ध्यानात घेता पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व नाले व नदीपात्र स्वच्छतेची मागणी करण्यात आली आहे.
- पावसाळा सुरू झाल्यानंतर लोणावळा शहरातील डांबराचा प्लांट बंद होतो त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरातील सर्व पॅचवर्कची कामे पूर्ण करा.
- अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ह्या गटारीतून व इतर ठिकाणाहून घेण्यात आले आहेत. जॉईंट वर लीग होऊन त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे येते तरी अशा सर्व पाईपलाईन ह्या दुरुस्त करून गटारीतून बाहेर घेण्यात याव्यात.
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण काम मागील पंधरा दिवसापासून बंद होते ते आता सुरू झाली आहे मात्र भविष्यात पुन्हा हे काम बंद होऊ नये याची सर्वतोपरी खबरदारी प्रशासनाने घ्यावी.
- लोणावळा शहरांमधील विविध विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे जी समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीमध्ये लोणावळा शहराचा प्रतिनिधी म्हणून आर्किटेक्ट असोसिएशनचे पदसिद्ध अधिकारी यांना माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नियुक्त करण्यात आले आहे. ही समिती म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाचे उधळपट्टी असल्याने प्रशासनाने ही समिती बरखास्त करण्यासाठी प्रयत्न करावेत व जोपर्यंत समिती आहे तोपर्यंत शहराचा प्रतिनिधी म्हणून पदसिद्ध असलेले आर्किटेक असोसिएशनचे अध्यक्ष गंगाराम मावकर यांना कायम ठेवण्यात यावे.
- लोणावळा शहरांमधील कैलासनग्गर स्मशानभूमी प्रमाणे गॅस शव दाहिनी बसवण्यात यावी. शहरातील इतर सर्व स्मशान भूमीमध्ये गॅस शव दाहिनी बसवत त्या कार्यान्वित करण्यात याव्यात.
अशा मागण्या लोणावळा शहर काँग्रेसकडून निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. यावेळी माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के, माजी उपनगराध्यक्ष संध्या खंडेलवाल, रवी सलोजा, जंग बहादुर बक्षी, कम्मुभाई जसदनवाला, अब्बास भाई खान, अँड. प्रफुल्ल रजपूत, मंगेश बालगुडे, सूर्यकांत औरंगे, संजय तळेकर, दिलीप जाधव, फिरोज बागवान आदी उपस्थित होते.