Lonavala Political News l लोणावळा काँग्रेसला अध्यक्ष मिळणार कधी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष अडचणीत

लोणावळा : देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची लोणावळा शहरातील संघटनात्मक स्थिती सध्या अडचणीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहर काँग्रेस अध्यक्षपद रिक्त असून, सध्या या पदाचा तात्पुरता कार्यभार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांच्याकडे देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर, अद्यापपर्यंत नवा अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेला नाही. परिणामी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अध्यक्षाशिवायच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून निखिल कवीश्वर यांनी पक्षाची धुरा सांभाळली.
पक्षांतर्गत रस्सीखेच, इच्छुकांच्या नावांवर एकमत न होणे, तसेच वरिष्ठांकडून होत असलेली दिरंगाई यामुळे शहराध्यक्षपद रिक्तच राहिले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या चार ते सहा महिन्यांत लोणावळा नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पक्षाला पूर्णवेळ, सक्रिय आणि सक्षम अध्यक्षाची अत्यंत गरज आहे, असे मत काँग्रेस समर्थकांमधून व्यक्त होत आहे.
राज्य व देशपातळीवर काँग्रेस पक्षाची स्थिती कमजोर असली, तरी लोणावळा शहरात मात्र संघटनात्मक बळावर पक्षाने आपली पकड टिकवून ठेवली आहे. नगर परिषदेतील काँग्रेसचं संख्याबळ सातत्याने पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिलं आहे.
आगामी निवडणुकीत विजयासाठी, पक्षाच्या विचारधारेचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि आंदोलनांच्या माध्यमातून शासनाकडून जनतेसाठी दिलासा मिळवणे—या सर्व गोष्टींसाठी काँग्रेसला एक सक्रिय आणि प्रभावी अध्यक्ष हवा आहे. वरिष्ठ नेतृत्वाने लवकरच यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाढत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.