लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली आढावा बैठक

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती व त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी लोणावळा नगर परिषदेमध्ये मंगळवारी सकाळी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये लोणावळा शहरातील विकास कामांची माहिती घेण्यात आली तसेच लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जातील याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले. भुशी धरण या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात येथे येणाऱ्या पर्यटकांना भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच येथील व्यवसायिकांना देखील रोजगार मिळावा याकरिता प्रशासनाने रेल्वे विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. भुशी धरण व त्याच्या परिसरामध्ये असलेली जागा ही मध्य रेल्वेच्या मालकीची आहे. रेल्वे कडून सदरची जागा भाडेतत्त्वावर व्यवसायिकांना उपलब्ध झाल्यास त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करता येऊ शकतो तसेच येणाऱ्या पर्यटकांना देखील सुविधा उपलब्ध करून देता येऊ शकतात प्रस्ताव पाठवल्यानंतर त्या प्रस्तावाची प्रत माझ्याकडे द्या रेल्वे प्रशासनाकडे मी पाठपुरावा करेल असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. दुपारचे लोकल सुरू करण्याबाबत सातत्याने रेल्वेमंत्री व रेल्वेचे जीएम यांच्यासोबत चर्चा व पाठपुरावा सुरू आहे काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ही लोकल सुरू होत नाही त्यामुळे हा प्रश्न लांबलीवर पडला आहे मात्र माझा पाठपुरावा सुरू आहे दरम्यानच्या काळामध्ये तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे देखील काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लोणावळा शहरांमधील भाजी मंडईचा विषय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम व पावसाळापूर्वी करण्यात येणारी कामे ही वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. नदीपात्र व नाले सफाई बाबत देखील अधिकारी वर्ग कडून सद्यस्थितीत जाणून घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करा अशा सूचना खासदार बारणे यांनी दिल्या. लोणावळा शहरातील वाहतुकीवर महत्त्वाचा तोडगा ठरणाऱ्या नांगरगाव भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाबाबतची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली रेल्वे प्रशासनाकडून त्यांचे काम पूर्णत्वास जात आहे. नगरपरिषदेकडून रखडलेल्या कामाला देखील आता गती मिळाली असून पुढील काही दिवसांमध्ये हे काम मार्गी लागेल असे यावेळी सांगण्यात आले. तसेच हनुमान टेकडी समोरून जाणारा रस्ता हा संरक्षण विभागाच्या जागेतून न घेता वनविभागाच्या जागेतून घेतल्यास हे काम लवकर मार्गी लागेल, असा नवा प्रस्ताव तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोणावळा शहरामध्ये वाहन तळाची जागा निश्चित असल्यास त्या ठिकाणी एलिव्हेटेड वाहनतळ करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मी घेतो असे खासदार बारणे यांनी सांगितले. यासह विविध समस्यांबाबत साधक वादक चर्चा या बैठकीत करण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेने पुढील दहा दिवसांमध्ये प्रस्ताव संबंधित शासनाच्या विभागाकडे पाठवण्यात यावे व त्याचा अहवाल सादर करावा असे खासदार बारणे यांनी सांगितले.
या बैठकीला मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, वनविभागाचे अधिकारी सोमनाथ ताकवले, वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्री चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, मनसे अध्यक्ष निखिल भोसले, आरपीआय शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, पुणे जिल्हा युवा सेना अधिकारी दत्ता केदारी, मावळ तालुका अधिकारी विशाल हुलावळे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, मनसे प्रवक्ते अमित भोसले, आशिष बुटाला, सुनील तावरे, राजू दळवी, श्वेता वर्तक, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, मनीषा भांगरे, विवेक भांगरे, विशाल पाठारे आदी मान्यवर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.