Breaking news

Lonavala Political News l मावळ तालुक्यात भाजप कडून चार मंडल अध्यक्ष जाहीर; लोणावळ्याचा निर्णय अद्याप प्रलंबित

लोणावळा : भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक बदल करत 100 बूथ मिळून एक मंडल अध्यक्ष अशी नवीन रचना केली आहे. यामध्ये शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांचा एकत्रित समावेश करण्यात आलेला आहे. या नवीन संघटनात्मक बदलानुसार मावळ तालुक्यामध्ये पाच मंडल तयार करण्यात आली आहेत. या पाचही मंडळासाठी इच्छुकांचे अर्ज व मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार मावळ तालुक्यामधील पवन मावळ मंडल, वडगाव आंदर मावळ मंडल, तळेगाव दाभाडे इंदोरी गण मंडल, देहू - देहूरोड मंडल व लोणावळा कार्ला गण मंडल असे पाच भाग करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मावळ तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष ही पदे इतिहास जमा होणार आहेत.

       मावळ तालुक्यामध्ये 402 बूथ असून त्यामधून हे पाच मंडळ निर्माण करण्यात आले आहेत. या नवीन रचनेप्रमाणे लोणावळा मंडल वगळता उर्वरित चार ठिकाणी अध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आले आहेत. लोणावळा शहरांमध्ये मात्र भाजपामध्ये दोन गट आहेत एका गटाकडून विद्यमान अध्यक्ष अरुण लाड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे तर दुसऱ्या गटाकडून अनिल गायकवाड यांच्या नावाची शिफारस करण्यात आले आहे. मात्र या दोन्हीपैकी कोणत्याही एका नावावर अद्याप एक मत न झाल्याने लोणावळा मंडल अध्यक्ष पदाची निवड रखडली आहे. दोन्ही नावांमध्ये मतमतांतरी असल्यामुळे नेमकी कोणाला संधी मिळणार की या दोन्ही नावांना बाजूला सारत तिसरेच नाव पुढे येणार याबाबत सध्या भाजपाच्या गोठात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. 

       अरुण लाड यांनी मावळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महा युतीचा धर्म पाळत आमदार सुनील शेळके यांचे काम केले होते. तर अनिल गायकवाड यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचे काम केले होते. अरुण लाड यांच्या मते त्यांनी पक्ष आदेश पाळत महायुतीचे काम केले आहे तर गायकवाड यांनी मावळ तालुक्यातील स्थानिक नेत्यांच्या आदेशाचे पालन केले होते. दोन्ही इच्छुक उमेदवार हे तुल्यबळ असल्याने कोणाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपा पक्ष महायुतीच्या धर्माचे पालन करणाऱ्या इच्छुकाला अध्यक्षपदाची संधी देणार की महायुतीच्या विरोधात गेलेल्या व स्थानिक नेत्यांच्या सोबत राहिलेल्या इच्छुक उमेदवाराला संधी देणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

     सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे लोणावळा मंडल अध्यक्ष निवड करताना लोणावळा शहरातील भाजपच्या दोन्ही गटांना एकत्र करत पुढे घेऊन जाणारा सर्व समावेशक अध्यक्ष निवडणे ही वरिष्ठांपुढे महत्त्वाची कसरत असणार आहे. मागील पंचवार्षिक काळामध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता होती नगराध्यक्ष देखील भाजपा पक्षाचे होते. आता मात्र सर्वच राजकीय पक्षांमध्ये दोन गट पडले असल्याने व शहरांमधील एकंदरीत वातावरण हे महा युतीच्या बाजूने असल्याने त्याचा येणाऱ्या लोणावळा नगरपरिषद निवडणुकीवर परिणाम होणार यात शंका नाही. त्यामुळे मंडल अध्यक्ष निवड करताना वरिष्ठांना सर्व बाजू विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागणार असल्याने सध्या तरी लोणावळा मंडल अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली असल्याचे चित्र आहे.

इतर बातम्या