मोठी बातमी l मळवली उड्डाणपुलाच्या नवीन आराखड्याला नागरिकांचा विरोध; खासदार श्रीरंग बारणे यांना दिले निवेदन

लोणावळा : पुणे-मुंबई लोहमार्गावर असलेल्या मळवली रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या कामाचा सुरुवातीला तयार करण्यात आलेला आराखडा स्थानिक नागरिकांना मान्य होता. मात्र, अलीकडे अचानक त्या आराखड्यात बदल करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. या नवीन आराखड्यामुळे स्थानिकांचे प्रचंड नुकसान होणार असल्याने नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांना लेखी निवेदन देत 20 मे रोजी होणारी मोजणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
मळवली हे लोणावळ्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. या भागात कार्ला लेणी, भाजे लेणी, धबधबा, लोहगड आणि विसापूर किल्ला ही पर्यटनस्थळे असल्याने येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे मळवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने व घरे उभी आहेत. पूर्वी तयार केलेल्या आराखड्यामुळे कोणाचेही कोणतेही नुकसान होणार नव्हते, कारण तो सध्याच्या रस्त्याच्या मार्गावर होता. मात्र, सध्या तयार करण्यात आलेला नवीन आराखडा वळणाकार असून त्यामुळे सुमारे 10 ते 12 घरे आणि 40 हून अधिक दुकाने बाधित होणार आहेत. नागरिकांच्या मते, हा बदल केवळ त्रास देण्याच्या हेतूने केला गेला आहे.
निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, पूर्वीचा आराखडा कायम ठेवला तर कोणालाही हरकत नाही. मात्र, नवीन आराखडा अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा आहे, म्हणून तो रद्द करावा आणि त्यावर आधारित होणारी मोजणी त्वरित थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.