थोडीशी चूक देखील जीवावर बेतली असती ! सर्प मित्रांनी संकटात सापडलेल्या नाग जातीच्या विषारी सापाला दिले जीवदान
खोपोली (वार्ताहर) : खालापूर तालुक्यातील चौक या गावात कुंपणाला लावण्यासाठी असलेल्या आणि अडगळीत ठेवलेल्या जाळीत साप अडकल्याची माहिती "स्नेक रेस्क्युअर्स खोपोली - खालापूर" या संस्थेचे सदस्य सर्पमित्र रोहिदास म्हसणे यांना मिळाली. असे प्रसंग नेहमीच हाताळणाऱ्या रोहिदास हे त्या सापाला जाळीतून सोडून सुरक्षित वनक्षेत्रात सोडण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की, तो साधासुधा साप नसून पूर्ण वाढ झालेला नाग जातीचा विषारी साप होता. अर्थातच नाग सापाला त्या जाळीतून सोडवताना खूप मोठी रिस्क होती, कारण तो बऱ्याच वेळापासून जाळीत अडकलेला असल्याने खूप अग्रेसिव्ह झाला होता. त्याला रिलीज करण्याचे काम एकट्याचे नव्हते यासाठी त्यांनी नवीन मोरे आणि सुनील पुरी या सर्पमित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. थोडीशी चूक देखील जीवावर बेतली असती. त्या तिघांनी मिळून अत्यंत कुशलतेने त्या नागाला कोणतीही इजा न होता व्यवस्थित जाळ्यातून सोडवण्यास सुरुवात केली. ते थरारक दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येत होते मात्र ते तिघेही तन्मयतेने या ऑपरेशनला सक्सेस करूनच मोकळे झाले.
जाळीमध्ये जेरबंद झालेल्या विषारी नागाला रोहिदास, नवीन आणि सुनील हे वाचविण्यासाठी आले आहे हे त्या जीवाला माहीत नसल्याने तो मात्र त्यांच्यावर वारंवार जीवघेणा अटॅक करत होता. मात्र याकडे दुर्लक्ष न करता तिघांनी स्वतःचा बचाव करत शिताफिने आणि सुरक्षेची साधने वापरून त्याला जीवदान देण्याचे कर्तव्य पार पाडले. या ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावणारे नवीन मोरे आणि सुनील पुरी हे "अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे" फ्रंटलाईन वर्कर देखील आहेत. त्या तिघांच्या प्रयत्नांमुळे आज त्या जाळीत सापडलेल्या नागाला जीवदान मिळाले.