Lonavala News l लोणावळ्यात एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थासह तरुण ताब्यात; शहर पोलिसांची धडक कारवाई
लोणावळा : लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत, लोणावळा परिसरातून एका 21 वर्षीय तरुणाला एम.डी. (मेफेड्रॉन) या अमली पदार्थासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास लोणावळा शहर पोलिसांचे पथक गस्त घालत होते. यावेळी पुरंदर हायस्कूल ग्राऊंडजवळील फुटपाथवर एक संशयित तरुण फिरताना आढळून आला. पोलिसांनी संशयावरून त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळून आला.
काशिफ परवेज मुजावर (वय 21 वर्षे, रा. इंद्रायणीनगर, भांगरवाडी रोड, लोणावळा) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडे 1 ग्रॅम 500 मिलीग्रॅम वजनाचा एम.डी. अंमली पदार्थ सापडला असून, त्याची किंमत अंदाजे 10 हजार रुपये इतकी आहे. काशिफ याने हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या स्वतःच्या ताब्यात बाळगून होता, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल कुणाल महादेव तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, काशिफ मुजावर याच्यावर NDPS 8(C), 21(A) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 जून रोजी पहाटे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत.
तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांकडून सातत्याने अशा कारवाया केल्या जात असून, या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोणावळा शहराला अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्याचा निर्णय नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी देखील या करता सहकार्य करावे व आपल्या आजूबाजूला कोठेही अमली पदार्थ विक्री होत असल्यास अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास त्यांनी पोलीस स्टेशनचे संपर्क साधावा असे आव्हान देखील त्यांनी केली आहे.





















