Lonavala Traffic News l लोणावळा शहरात उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा वीकेंड हाउसफुल; मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
लोणावळा : शालेय उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा वीकेंड लोणावळा शहरात हाउसफुल झाला आहे. रविवारी 14 जून रोजी शाळांच्या सुट्ट्या संपणार असून 15 जून पासून राज्यभरातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या या शेवटच्या शनिवार व रविवारचा आनंद घेण्यासाठी लोणावळा खंडाळा या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत दाखल झाल्यामुळे लोणावळा शहरात शनिवारी दिवसभर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीत झाली होती. महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पर्यटकांच्या या गर्दीमुळे लोणावळा शहरातील हॉटेल्स खाजगी बंगलोज व ग्रामीण भागातील फार्म हाऊस हे फुल झाले होते. लोणावळ्यातील टायगर पॉईंट, खंडाळा राजमाची गार्डन, तुंगार्ली धरणाचा परिसर, आई एकवीरा देवीचे मंदिर व कार्ला लेणी चा परिसर, भाजी लेणी, लोहगड व विसापूर किल्ला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. पवना धरण परिसरात देखील दुधीवरे खिंड मार्गे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांची व वॉर्डन्स यांची दमछाक होताना पाहायला मिळाले. लोणावळा शहरामध्ये अद्याप मान्सूनचा पाऊस दाखल झालेला नाही त्यामुळे उकाडा देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाळी पर्यटनाचा हंगाम येथे सुरू होणार आहे. पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा शहर हे प्रसिद्ध असल्यामुळे दर शनिवार रविवारी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. येणारे पर्यटक व त्यांची वाहने यांचे योग्य नियोजन करण्याची कसरत यामुळे पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे.






















