Breaking news

कैवल्यधामचे सुबोध तिवारी यांची आयुष मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीत नियुक्ती; योग क्षेत्रातील संशोधनाला मिळणार नवी दिशा

लोणावळा : लोणावळ्यातील जागतिक ख्यातीप्राप्त 'कैवल्यधाम योग संस्थे'चे मानद सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था' आणि 'वैज्ञानिक संशोधन समिती'च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे योग क्षेत्रातील संशोधनात्मक कार्याला नवी गती मिळणार असून, योगप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि नियुक्ती

सुबोध तिवारी यांची ८ जून २०२६ रोजी आरोग्य आणि कौटुंबिक कल्याण क्षेत्रातील योग मंत्रालयाच्या उच्चस्तरीय 'सुकाणू गटाच्या' (Steering Committee) सदस्यपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. योग आणि विज्ञानाचा समन्वय साधण्यात त्यांचा गाढा अनुभव असल्याने, ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे योगाच्या वैज्ञानिक पैलूंना अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

कैवल्यधामचा ऐतिहासिक वारसा आणि तिवारींचे योगदान

सुबोध तिवारी हे शंभरहून अधिक वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या कैवल्यधाम संस्थेचे प्रतिनिधित्व करतात. ही संस्था योग परंपरेसोबतच आधुनिक वैज्ञानिक संशोधनासाठी जगभर ओळखली जाते. तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कैवल्यधाममध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण योग उपक्रम राबविले जात आहेत. योग केवळ एक व्यायाम नसून ती एक जीवनपद्धती आहे, हा विचार देशभर पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

योगाच्या प्रसाराचा मानस

आपल्या या नवीन जबाबदारीबद्दल बोलताना तिवारी यांनी सांगितले की, देशाच्या कानाकोपऱ्यात योगाचा प्रसार करणे हे आमचे ध्येय आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून योगाची व्याप्ती वाढवून सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी योगाचा उपयोग करून घेण्यावर त्यांचा भर आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे योगक्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इतर बातम्या

रायवूड भागामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदाई; पंधरा दिवसापासून काम बंद, सोमवारपासून या भागातील शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर